बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केलेल्या आरोपीला अटक
वृत्तसंस्था/ फिलाडेल्फिया
अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरातील किंग्सेसिंगमध्ये सोमवारी रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात 4 जण मारले गेले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोळीबारावेळी आरोपीने बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केले होते. त्याच्याकडून एक रायफल, हँडगन हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीने गोळीबार का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोमवारी रात्री सुमारे 8.30 वाजता एका पोलीस अधिकाऱ्याला गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता, यानंतर त्याने एका परिसरात जखमीला पाहिले होते. तसेच स्थानिक लोकांनी रायफल घेऊन एक व्यक्ती फिरत असल्याची माहिती दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना 4 जणांचे मृतदेह आढळून आले. याचबरोबर तेथे आढळून आलेल्या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचा आणि स्थिती नियंत्रणात येईपर्यंत स्वत:च्या घरांमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. फिलाडेल्फियामध्ये चालू वर्षात आतापर्यंत हत्येचे 212 गुन्हे नोंद झाले आहेत. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा 19 टक्क्यांनी कमी आहे. अमेरिकेत चालू वर्षात आतापर्यंत 300 हून अधिक मास शूटिंगच्या घटना घडल्या आहेत.









