महिलेच्या हत्येनंतर पोलीस कर्मचाऱयाची आत्महत्या
@ कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील पार्क सर्कस येथे शुक्रवारी दिवसाढवळय़ा बांगलादेश उच्चायुक्तालयाजवळ अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. येथे एका पोलीस कर्मचाऱयाने (होमगार्ड जवान) महिलेची गोळय़ा झाडून हत्या केल्यानंतर आत्महत्या केली. एकंदर या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. घटनेनंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गोळीबार करणारा पोलीस जवळपास तासभर बांगलादेश उच्चायुक्तालयाजवळ फिरत होता. होमगार्ड जवानाने अचानक गोळीबार सुरू केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. हल्लेखोर बांगलादेश उच्चायुक्तालयात सुरक्षा कर्मचारी म्हणून तैनात असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय गृहमंत्रालयानेही या प्रकरणाची दखल घेत बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे.
बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाल्याची माहिती सुरक्षा सूत्रांनी दिली. येथे एका पोलीस कर्मचाऱयाने गोळीबार केल्यामुळे दुचाकीस्वार महिला ठार झाली. यानंतर पोलीस कर्मचाऱयाने स्वतःवरही गोळी झाडली. गोळीबारात रस्त्यावरून जाणारा एक दुचाकीचालकही गोळी लागल्याने जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा महानगरात गोळीबाराच्या या घटनेनंतर घबराटीचे वातावरण पसरले होते. तसेच या घटनेनंतर परिसरातील विविध रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरि÷ पोलिस अधिकाऱयांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाभोवतीच्या रस्त्याची नाकाबंदी करण्यात आली होती.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराकडून सुमारे 10-15 गोळय़ा झाडण्यात आल्या. याप्रसंगी रस्त्यावरून जाणाऱया एका महिलेला गोळय़ा लागल्या आणि तिचा मृत्यू झाला. ही महिला दुचाकीवरून जात होती आणि त्या दुचाकीचालकालाही गोळी लागली आहे. महिलेबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरातील दुकानेही बंद करण्यात आली.









