इस्रायलची राजधानी हादरली : 2 हल्लेखोरांना कंठस्नान
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलची राजधानी जेरूसलेममध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला आहे. या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत अशी माहिती पोलीस आणि इस्रायलच्या मेडिकल सर्व्हिसचे प्रमुख मेगन डेव्हिड एडोम यांनी दिली आहे. जखमींमधील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये एक इसम 50 वर्षांचा तर दुसरा 30 वर्षांचा नागरिक होता.
तर गोळीबार करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. गोळीबार करणारे हे दहशतवादी रामल्लाह क्षेत्राच्या गावांमधून आले होते असे मानले जात आहे. इस्रायलचे सुरक्षा अधिकारी या दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.
गोळीबाराची घटना जेरूसलेमच्या उत्तर प्रवेशद्वारावरील प्रमुख चौकात घडली आहे. या चौकातूनच पूर्व जेरूसलेम येथील ज्यू वसाहतींच्या दिशेने जाणारा रस्ता आहे. गाझामधील युद्धामुळे इस्रायलच्या ताब्यातील भाग आणि इस्रायल दोन्ही ठिकाणी हिंसेत वाढ झाली आहे. पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये अनेक इस्रायली नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.









