मिशिगनमधील घटनेत हल्लेखोरही ठार, अग्नितांडवात 8 जखमी
वृत्तसंस्था/ मिशिगन
अमेरिकेत रविवारी रात्री मिशिगनमधील ग्रँड ब्लँक येथील एका चर्चमध्ये गोळीबार झाला. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. तसेच पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात संशयित हल्लेखोरही ठार झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर चर्चमध्ये आग लागल्यामुळे चर्च पूर्णपणे जळून खाक झाले. उद्ध्वस्त झालेली ही वास्तू ‘चर्च ऑफ जीझस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्स (एलडीएस) च्या मालकीची होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल साईटवर आपले मत व्यक्त केले आहे. ‘हा ख्रिश्चनांवर जाणूनबुजून केलेला हल्ला आहे. आपल्या देशातील हिंसाचाराची ही साथ त्वरित थांबवली पाहिजे.’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
मिशिगनमधील ग्रँड ब्लँक येथील चर्चमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख 40 वर्षीय थॉमस जेकब सॅनफोर्ड अशी झाली आहे. सॅनफोर्डने असॉल्ट रायफल वापरली. त्याच्या हल्ल्याचे कारण लगेच कळू शकलेले नाही. पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात सॅनफोर्डचाही मृत्यू झाला. सॅनफोर्डने 2004 ते 2008 पर्यंत मरीन कमांडोमध्ये सेवा बजावली होती. या सेवेदरम्यान त्याला पाच पदके देण्यात आली होती. अल-जझीराच्या वृत्तानुसार, सॅनफोर्डचा मुलगा एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्याला नोकरी सोडावी लागली. गोळीबारानंतर सॅनफोर्डने चर्चला आग लावली. सुरुवातीला गोळीबारात दोघे ठार झाले. तर उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. या हल्ल्यात आठ जण जखमी असून त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. ग्रँड ब्लँक टाउनशिप पोलिसांनी लोकांना बचाव आणि आपत्कालीन सेवांमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.









