वृत्तसंस्था/ शिकागो
अमेरिकेतील शिकागोमध्ये दोन वेगवेगळ्या घरांमध्ये झालेल्या गोळीबारात 8 जण मारले गेले आहेत. दोन्ही घटना शिकागो येथील इलिनोइसच्या जोलियटमधील दोन घरांमध्ये घडल्याची माहिती तेथील पोलिसांनी मंगळवारी दिली आहे. गोळीबरा करणाऱ्या हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. मृतांच्या कुटुंबाला आरोपी ओळखत होता. आरोपीने कोणत्या कारणामुळे या लोकांची हत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. परंतु सर्व मृत हे एकाच कुटुंबाचे सदस्य असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गोळीबार करणाऱ्या 23 वर्षीय आरोपीची ओळख पटली असून रोमियो नेंस असे त्याचे नाव आहे. गोळीबारानंतर तो फरार झाला आहे. आरोपी नेन्सकडे शस्त्र असल्याने पोलिसांनी त्याला धोकादायक घोषित केले आहे. तसेच पोलिसांनी आरोपीबद्दल माहिती देण्याचे आवाहन लोकांना केले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांना एफबीआयचे एक पथक मदत करत आहे.
नेन्स हा जोलियटच्या नजीकच्या परिसरात राहत होता. 2023 मध्ये करण्यात आलेल्या गोळीबाराच्या एका प्रकरणी आरोपी असलेला नेंस अलिकडेच जामिनावर बाहेर पडला होता. नेन्सला यापूर्वी एका महिलेशी निगडित प्रकरणीही अटक करण्यात आली होती.
नागरिकांकडे बंदुका असण्याप्रकरणी अमेरिका जगात आघाडीवर आहे. जगातील एकूण 85.7 कोटी नागरी बंदुकांपैकी केवळ अमेरिकेत 39.3 कोटी नागरी बंदुका आहेत. जगाच्या लोकसंख्येत अमेरिकेचा हिस्सा 5 टक्के आहे. परंतु जगातील एकूण नागरी शस्त्रांपैकी 46 टक्के शस्त्रs केवळ अमेरिकेत आहेत.









