आरोपीकडून शेजाऱयाच्या घरात घुसून गोळीबार
वृत्तसंस्था/ क्लीवलँड
अमेरिकेच्या टेक्सासमधील क्लीवलँडमध्ये एका गनमॅनने संतापाच्या भरात शेजाऱयांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात 8 वर्षीय मुलासमवेत 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. गनमॅनने स्वतःच्या घराच्या परिसरात गोळीबार करत होता. त्यादरम्यान शेजारी राहणाऱया लोकांनी त्याला गोळीबार बंद करण्याची सूचना केली होती. यामुळे संतापलेल्या गनमॅनने शेजाऱयांच्या घरात घुसून गोळीबार केला आहे. पोलिसांनी आता आरोपीचा शोध चालविला आहे.
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. घटनास्थळी 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये 8 वर्षीय मुलासमवेत 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेवेळी घरात 10 जण होते. आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. शेजाऱयांनी त्याला रोखण्यास प्रयत्न केल्यावर त्याच्यासोबत त्यांची हुज्जत झाली होती.
आरोपी हा मूळचा मेक्सिकोचा नागरिक असून त्याचे नाव फ्रान्सिस्को ओरोपेज आहे. सध्या तो फरार झाला आहे. तर गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीला अटक होईपर्यंत लोकांना घरातच थांबण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. संबंधित आरोपी दररोज गोळीबार करायचा, त्याच्यासाठी गोळीबार हे सामान्य कृत्य होता. याप्रकरणी पोलिसांना अनेकदा कळवूनही कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती.









