फ्लोरिडात घडली घटना, 5 जण जखमी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील एका विद्यापीठात गोळीबाराची घटना घडली असून यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक डेप्युटी शेरिफच्या मुलाने जुन्या सर्व्हिस गनद्वारे फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्sय विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. गोळीबार सुरू झाल्यावर परिसर बंद करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी राहण्याचा निर्देश देण्यात आला. हल्लेखोराचे नाव फीनिक्स इकनर असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर 5 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
20 वर्षीय इकनर हा विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि एका कर्मचाऱ्याचा पुत्र होता. वडिलांकडे असलेल्या शस्त्रांपैकी एक शस्त्र घेऊन तो विद्यापीठात पोहोचला होता. हल्लेखोर विद्यार्थ्याला स्थानिक पोलिसांनी गोळी मारून जखमी केले आणि ताब्यात घेतल्याची माहिती लियोन काउंटीचे शेरिफ वॉल्ट मॅकनील यांनी दिली आहे.
गोळी लागल्याने इकनरला रुग्णालयात हलविण्यात आले, तेथील त्याच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. तर या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यात एक युवत पळत असलेल्या लोकांवर गोळी झाडताना दिसून येतो. गोळीबाराच्या घटनेत मृत्युमुखी पडलेले दोन्ही जण विद्यार्थी नव्हते असे पोलिसांनी सांगितले आहे. हल्ल्याने प्रभावित लोकांच्या सहाय्यासाठी विद्यापीठ पावले उचलत आहे. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीसाठी हा दु:खद दिवस आहे असे उद्गार विद्यापीठाचे अध्यक्ष रिचर्ड मॅक्कुलो यांनी काढले आहेत.









