प्रतिनिधी/ बेळगाव
चेनस्नॅचिंग व दरोडे प्रकरणातील एका आरोपीला गोळीबार करून ताब्यात घेण्यात आले आहे. कित्तूर पोलिसांनी शनिवारी सकाळी ही कारवाई केली असून दरोडेखोराच्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकासह चौघेजण जखमी झाले आहेत. तर गोळीबारात दरोडेखोर जखमी झाला आहे. रमेश उद्दाप्पा किलारी (वय 25) राहणार बेनचिनमर्डी, ता. गोकाक असे गोळीबारात जखमी झालेल्या दरोडे प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. यावेळी झालेल्या झटापटीत कित्तूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ (वय 40) व शरीफ दफेदार (वय 35), ए. एम. चिक्केरी (वय 35), निंगराज गळगी (वय 38) हे चौघेजण जखमी झाले असून त्यांच्यावरही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कित्तूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
शनिवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून हेल्मेट व जर्किन घालून येत असलेल्या एका संशयिताविषयी पोलिसांना माहिती मिळाली. डोंबरकोप्प आयबीजवळ मोटारसायकलवरून येणारा रमेश कित्तूर पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला मोटारसायकल थांबवण्यासाठी हात दाखवला. पोलिसांना बघून त्याने मोटारसायकल वळविली. धारवाडच्या दिशेने जाताना मारिहाळ कल्याण मंटपाजवळील अंडरपासच्या माध्यमातून पलायन करण्यासाठी त्याचा प्रयत्न होता. पोलिसांनीही जीपमधून त्याचा पाठलाग केला. मोटारसायकलला जीपची धडक बसल्याने आपली मोटारसायकल तेथेच सोडून कच्च्या रस्त्यावरून तो धावत सुटला. त्याच्याजवळ चाकू होता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पाठलाग केला.
शरीफ दफेदार यांनी रमेशला पकडण्यासाठी त्याच्यावर झडप घातली. त्यावेळी त्याने शरीफवर चाकू हल्ला केला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. गोळीबारात जखमी झालेल्या रमेशला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. उपचारांती त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे.
गोळीबारात जखमी झालेला रमेश किलारी हा अनेक प्रकरणात आरोपी आहे. त्याच्यावर चार दरोडे, एक रॉबरी, एक गँगरेप व शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एक गुन्हा याबरोबरच आणखी तीन गुन्ह्यांत तो आरोपी असून पाच प्रकरणांमध्ये विनाजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामनगौडा बसरगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन जखमी पोलिसांची विचारपूस केली.









