4 ठार 9 जण जखमी
वृत्तसंस्था/ ट्युनिस
ट्युनीशियाच्या जेरबा बेटावर असलेल्या एल घ्रिबा सिनेगॉग या धार्मिक स्थळी गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एका सुरक्षारक्षकासमवेत 4 जण मृत्युमुखी पडले आहेत. 2500 वर्षे जुने अल घ्रिबा सिनेगॉग हे आफ्रिकेतील सर्वात जुने धार्मिक स्थळ आहे. या धार्मिकस्थळी मंगळवारी रात्री वार्षिक तीर्थयात्रेदरम्यान हल्ला करण्यात आला आहे. अल घ्रिबा सिनेगॉगमध्ये युरोप आणि इस्रायलमधून मोठ्या संख्येत ज्यू धर्मीय येत असतात.
अल घ्रिबा सिनेगॉगमध्ये झालेल्या गोळीबारात दोन भाविक अन् एका सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर हल्लेखोराने स्वत:च्या एका सहकाऱ्याचाही जीव घेतला आहे. या घटनेत किमान 5 सुरक्षा अधिकारी आणि अन्य 4 नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच तेथे प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.









