कोल्हापूर :
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील सुरेश कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न व अर्जुन पुरस्कारांची घोषणा केली. विशेष म्हणजे, स्वप्नील कुसाळेच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांनाही द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात स्वप्नीलला गौरविण्यात येईल. याशिवाय, स्वतंत्र भारताला पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या सांगलीच्या मुरलीकांत राजाराम पेटकर यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन जीवनगौरव तर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात रौप्यपदक जिंकणाऱ्या सांगलीच्या सचिन खिलारीला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
दरम्यान, चारच महिन्यांपूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात स्वप्नीलने देशासाठी कांस्यपदक जिंकले होते. तब्बल 72 वर्षांनंतर महाराष्ट्राला स्वप्नीलच्या कांस्यपदकाच्या ऊपाने दुसरे ऑलिम्पिक पदक मिळाले आहे.
स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताला ऐतिहासिक असे कांस्यपदक मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीने तब्बल 72 वर्षानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यश आले. स्वप्नील हा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी (ता. राधानगरी) येथील रहिवासी आहे. कांबळवाडी ते पॅरिस असा नेमबाजीत धक्कादायक प्रवास करणाऱ्या स्वप्नीलने 50 मी रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताला मोठे यश मिळवून दिले. नुकत्याच भोपाळ (मध्यप्रदेश) झालेल्या 67 व्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेतसुद्धा महाराष्ट्रातर्फे प्रतिनिधीत्व करत त्याने 50 मीटर रायफल प्रोन या प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
तसेच 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात रौप्यपदक जिंकले. यासह त्याने आजवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत केलेल्या कामगिरीची दखल घेत क्रीडा मंत्रालयाकडून अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वप्नीलला पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच त्याच्या आई–वडीलांवर नातेवाईक, मित्रमंडळींनी अभिनंदनाचा वर्षाव केला. यावेळी कांबळवाडी ग्रामस्थांनी साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
प्रशिक्षिका दिपाली देशपांडे यांचा ‘द्रोणाचाय’ने सन्मान
खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील हा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. स्वप्नीलच्या यशात माजी नेमबाज अन् प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याने आपल्या मुलाखतीत अनेकदा प्रशिक्षिका देशपांडे यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला आहे. गुरुवारी एका बाजूला खेळाडू म्हणून स्वप्नीलला अर्जुन पुरस्कार तर कोच दीपाली देशपांडे यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान होणे ही क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
डी.गुकेश, मनूभाकरसह चौघांना खेलरत्न
भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची घोषणा केली आहे. बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेश, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार या चौघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय, 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.








