वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या 65 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तुल नेमबाजीत भारताची ऑलिम्पिक नेमबाज मनु भाकरने आपले निर्विवाद वर्चस्व राखले. या स्पर्धेत भाकरने 4 सुवर्णपदकांची कमाई केली. तिने महिलांच्या वैयक्तिक तसेच कनि÷ गटात प्रत्येकी 1 सुवर्ण तसेच सांघिक प्रकारात आणखी 2 सुवर्णपदकांची कमाई केली.
हरियानाच्या मनु भाकरने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल नेमबाजीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पुष्पांजली राणाचा 33-27 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर कनि÷ महिलांच्या 25 मीटर पिस्तुल नेमबाजीत मनु भाकरने आपल्याच राज्याच्या विभुती भाटियाचा 32-24 असा पराभव करत दुसरे सुवर्णपदक पटकाविले. बुधवारी या स्पर्धेत हरियाना संघाने सांघिक प्रकारात 2 सुवर्णपदके मिळविली असून हरियानाच्या संघात मनु भाकरचा समावेश होता. महिलांच्या 25 मीटर पिस्तुल नेमबाजीत विभुती भाटियाने कांस्यपदक तर कनि÷ महिलांच्या विभागात तेलंगणाच्या मेघना साधूलाने कांस्यपदक घेतले.
केरळमधील थिरुवनंतपुरमच्या नेमबाजी संकुलात झालेल्या राष्ट्रीय रायफल नेमबाजीमध्ये पंजाबच्या समीक्षा धिंग्रा आणि अर्जुन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळविताना मध्यप्रदेशच्या श्रेया अगरवाल आणि हर्षित यांचा 17-5 असा पराभव केला. राजस्थानच्या दिव्यानेश सिंग आणि निशा कंवर त्याचप्रमाणे तामिळनाडूच्या श्री कार्तिक शबरी आणि आर. नर्मदा यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागेल. हरियानाच्या नॅन्सी आणि गुरुमुख यांनी कनि÷ गटात मिश्र सांघिक नेमबाजीत सुवर्णपदक मिळविताना कर्नाटकाच्या तिलोत्तमा सेन आणि डेरियस यांचा 16-10 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या आर्या आणि रणवीर तसेच चंदीगढच्या मिहीत आणि हर्षा यांना कांस्यपदके मिळाली. नवी दिल्लीतील झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत मध्यप्रदेशच्या अन्वर हसन खान आणि मनीषा किर यांनी ट्रप मिश्र सांघिक नेमबाजीत सुवर्णपदक मिळविताना तामिळनाडूच्या निविता आणि पृथ्वीराज यांचा 6-4 असा पराभव केला. या क्रीडा प्रकारात राजस्थान आणि हरियाना यांना कांस्यपदके मिळाली.









