पोलिसांची गुप्तचर यंत्रणा ठरत कुचकामी
by प्रशांत जगताप
सातारा : पाचगणीतील ‘वर्षा व्हिला’ या आलिशान बंगल्यातील एका पार्टीचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अर्धनग्न बारबालांवर मस्तवाल धनिकांकडून १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचा अक्षरशः वर्षाव होताना दिसतो आहे. या घटनेमुळे थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेली पाचगणी आता ‘बारबालांच्या छमछमने गरम’ होत असल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे.
दिवसा नियोजन, रात्री उधळपट्टी!
मिळालेल्या माहितीनुसार, अशा पार्ट्यांचे दिवसा नियोजन ठरवले जाते आणि रात्री उशिरापर्यंत मद्यपान व अश्लील नृत्यांचे कार्यक्रम सुरू असतात. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या पद्धतीने हा संपूर्ण खेळ सुरू असून, पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणा या प्रकारांपुढे निष्प्रभ ठरत आहेत. स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, प्रशासनाच्या नाकाखाली हे प्रकार सुरू असताना पोलिसांनी याकडे डोळेझाक का केली?
राजाश्रय आणि दलालांचे जाळे
साताऱ्यातील काही स्थानिक दलाल पाचगणीला ‘पनवेल’ बनवण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे. हे दलाल श्रीमंत अंबटशौकीनांसाठी “हजारो रुपयांची शराब, लाखो रुपयांचा शबाब आणि मधे कबाब” पुरवतात.
महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील घनदाट झाडी आणि काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्याचा फायदा घेत, गर्द झाडीत लपवलेल्या आलिशान हॉटेलांमध्ये हे डान्सबार उघडपणे भरवले जातात.
राजकीय छत्रछाया की पोलिसांची ‘नॉट रीचेबल’ कारवाई?
जिल्हा पोलिसांकडे कारवाईची पुरेशी ताकद असली तरी राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक वेळा ही कारवाई ‘नॉट रीचेबल’ ठरते. तीन महिन्यांपूर्वीही एका खासगी कंपनीची पार्टी एका मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या हॉटेलात पार पडल्याची माहिती समोर आली होती. त्या वेळी हॉटेलच्या बाहेर लाल दिव्याची गाडी उभी होती, तर आत अश्लील नृत्य आणि नोटांचा पाऊस सुरू होता. नृत्यांगणावर एवढ्या नोटा उधळल्या गेल्या की, खालील मार्बलची पाटी सुद्धा दिसत नव्हती.
पाचगणीच्या प्रतिमेवर घाला
पाचगणी आणि महाबळेश्वर ही पर्यटनाची केंद्रे असून, ‘पुस्तकांचे गाव भिलार’ आणि ‘मधांचे गाव मांघर’ या नावाने साताऱ्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख स्थानिकांच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे जगभर पोहोचली. मात्र, पैशाच्या हव्यासापोटी काही दलाल आणि प्रभावशाली लोकांनी प्रशासनाला हाताशी धरून पाचगणीला बदनाम करण्याचा उद्योग सुरू केला आहे.
स्थानिकांनी पुढे येणे गरजेचे
पाचगणीची पर्यटनसंस्कृती व स्थानिकांची मेहनती प्रतिमा टिकवायची असेल, तर नागरिकांनी या प्रकारांविरोधात जागरूक राहून आवाज उठवणे आवश्यक आहे. अन्यथा, दलालांच्या वाकड्या पावलांनी पाचगणीचा सन्मान कायमचा मातीमोल होईल.








