कसबा प्रतिनिधी
कसबा बावडा येथील श्रीराम सेवा संस्था पेट्रोल पंपासमोर स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे. वर्दळीच्या वस्तीत रस्त्याकडेला एक दिवसाचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा स्वच्छता कर्मचाऱ्याला हे अर्भक सापडले असून त्या अर्भकाला तात्काळ सेवा रुग्णालयात दाखल केले आहे.
स्वच्छता कर्मचारी सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीराम सेवा संस्था पेट्रोल पंपा समोर कोंडाळ्यात पडलेला कचरा एकत्रित करत होता, यावेळी त्याला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्याला सुरुवातीला ही बाहुली असेल असे वाटले.पण कचरा हलवल्यानंतर त्यातून पुन्हा मुलाच्या रडण्याचा आवाज आला. यावेळी त्याला कचऱ्यात टाकलेले अर्भक कापडात गुंडाळल्याचे निदर्शनास आले. त्याने तात्काळ ही माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली असता अर्भकाला सेवा रुग्णालयात दाखल केले. याबाबत शाहूपुरी पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.









