सातारा :
सातारा जिह्यात महिला व बाल विकास विभागाकडून गेल्या दोन वर्षात 29 बालविवाह रोखण्यात आले आहेत. या उलट जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या दोन वर्षात 43 अल्पवयीन मुलींची प्रसुती झाली आहे. यातील मुलींचा बालविवाह झाल्या असून प्रसुती वेळी कागदपत्रे पाहिल्यावर ही बाब उघडकीस येत आहे. त्यानुसार रूग्णालयातील डॉक्टरांकडून ही माहिती पोलिसांना देण्यात येते. आणि विवाहित मुलीच्या पतीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होत आहे. या आकडेवारी नुसार जिह्यात छुप्या पद्धतीने बालविवाह होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
देशभर बालविवाहाच्या घटना घडत आहेत. सातारा जिह्यातही अशा घटना घडतात. यातील काही बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच महिला व बाल विकास विभागाकडून योग्य ती कारवाई करून हा बालविवाह रोखण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात महिला व बाल विकास विभागाने 29 बालविवाह रोखले आहेत. मात्र जिल्हा शासकीय रूग्णालयात 2023-24 मध्ये 32 व 24-25 मध्ये 11 अल्पवयीन मुलींची प्रसुती झाली आहे. यातील बऱ्यापैकी मुलींचा बालविवाह झाला आहे. तर काहीच प्रेमसंबंधातून गर्भवती राहिल्याची माहिती रूग्णालयातून देण्यात आली आहे. प्रसुती वेळी मुलीची कागदपत्रे तपासण्यात येतात. यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे कळताच डॉक्टरांकडून पोलिसांना याची माहिती देण्यात येते. यानुसार 29 बालविवाह रोखण्यात आले असले तरी प्रसुतीचे आकडे पाहता अद्याप छुप्या पद्धतीने बालविवाह जिह्यात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा घटना रोखण्यासाठी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे गरजेचे असून यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जिह्यात बालविवाहाची घटना घडत असल्याचे कळताच चाईल्ड लाईन च्या हेल्पलाईन नंबर 1098 वर फोन करून माहिती दिली पाहिजे. तुमच्या माहिती देण्याने योग्य ती कारवाई करून प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यात येतो.
मुलाचे आयुष्य होते उद्धवस्त
मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असताना पालक लग्न लावून देतात. परंतु प्रसुती वेळी रूग्णालयात मुलीच्या कागदपत्रांची तपासणी होऊन पोक्सो अंतर्गत मुलावर गुन्हा दाखल होतो. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्याला शिक्षाही होते. ही बाब आता पालकांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. लग्नासाठी मुली मिळत नाहीत, मुलाचे लग्न होईल का नाही या एका विचाराने पालक चुकीचा निर्णय घेतात. या निर्णयाने अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्धवस्त होतेच पण मुलाचे ही होते.
बालविवाह थांबवण्यासाठी खूप काम करणे गरजेचे
जिह्यातील लोणंद, जावली, कराड, पाटण या तालुक्यातील काही भागात जात पंचायत चालते. ही लोंक आजही कायदा मानायला तयार नाहीत. स्वत:च्या रूढी परंपरा पुढे नेण्यासाठी, मुलीचे प्रमाण कमी, मुलाचे लग्न नाही झाले तर या विचाराने बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. हे माहिती असतानाही करून देतात. या ठराविक समाजामध्ये बालविवाह होताना दिसतात. जर यांच्याविरूद्ध कोणी आवाज उठविला. तर त्याला वाळीत टाकण्याचे काम केले जाते. यासाठी प्रशासनाने जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यावर खूप काम करणे गरजेचे आहे.
अॅड. मनिषा बर्गे, सातारा








