ओटवणे : प्रतिनिधी
अवघ्या सहा दिवसात पती पाठोपाठ पत्नीचेही निधन झाल्याची दुर्दैवी घटना सावंतवाडी शहरातील झिरंग येथे घडली. या घटनेने नाईक कुटुंबियांना धक्काच बसला आहे. मंगेश बाबू नाईक (५५) आणि मयुरी मंगेश नाईक (५२) असे या दुर्दैवी दांपत्याचे नाव आहे.सावंतवाडी शहरात मच्छीमार्केट परिसरात मंगेश नाईक यांचे नाईक टेलर या नावाचे कपडे शिवण्याचे दुकान आहे. त्यांचे मंगळवारी ११ फेब्रुवारीला अल्प आजाराने निधन झाले. या धक्क्यातून नाईक कुटुंबीय सावरत असतानाच पती वियोगामुळे मयुरी नाईक यांचे रविवारी निधन झाले. पतीच्या निधनाचा त्यांना धक्का बसला होता. नेहमी हसतमुख व मनमिळावू स्वभावाच्या या दांपत्याच्या आकस्मिक निधनाचा सर्वांना धक्का बसला. त्यांच्या पश्चात तीन मुली, वडील -सासरे , तीन भाऊ, दीर, भावजय-जाऊ, पुतणे असा परिवार आहे. येथील संतोष आणि सुमन व कृष्णा नाईक यांचे ते भाऊ व भावजय होत.









