7 ऑक्टोबरपर्यंत वाढली न्यायालयीन कोठडी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली वक्फ बोर्डाशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना सोमवारी न्यायालयाकडून झटका बसला आहे. ईडीच्या मागणीवर राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने अमानतुल्लाह खान यांची न्यायालयीन कोठडी 7 ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे.
दिल्ली वक्फ बोर्डाचा अध्यक्ष असताना अमानतुल्लाह यांनी 32 जणांची अवैध भरती केली होते तसेच बोर्डाच्या अनेक संपत्ती भाड्याने दिल्या होत्या, तसेच निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
यापूर्वी 9 सप्टेंबर रोजी न्यायालयाने अमानतुल्लाह खान यांची न्यायालयीन कोठडी 23 सप्टेंबरपर्यंत वाढविली होती. अमानतुल्लाह खान यांना 2 सप्टेंबर रोजी ईडीने अटक केली होती. यानंतर तपास यंत्रणेने त्यांची 6 तासांपर्यंत चौकशी केली होती.









