महामार्गावरील पोलादपूरनजीकची घटना; तिघेजण गंभीर जखमी
खेड प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीजवळ ग्रामीण रूग्णालयाजवळ शिवशाही बस व इर्टिगा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी 9च्या सुमारास घडला. अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा होवून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
जयवंत सावंत (60, रा. अंबरनाथ-मुंबई), किरण घागे (28, रा.घाटकोपर-मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. गिरीश सावंत (34), जयश्री सावंत (56, दोघेही रा. अंबरनाथ-मुंबई), अमित भितळे (30, बदलापूर-मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने उपचारार्थ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी कामोठे येथील महात्मा गांधी मेमोरियल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसचा चालक प्रकाश अर्जुन तरडे हा एम.एच.09 ई.एच. 3530 कमांकाच्या शिवशाही बसमधून गणेशोत्सवासाठी जादा प्रवाशांना घेवून तालुक्यातील जामगे येथे आला होता. या ठिकाणी प्रवाशांना सोडल्यानंतर रिकामी बस घेवून मुंबईच्या दिशेने जात होता. याचवेळी चालक किरण घागे हा एम.एच.05 सी.व्ही. 3599 कमांकाची इर्टिगा कार घेवून मुंबईहून साखरप्याच्या दिशेने जात असताना पोलादपूर येथील ग्रामीण रूग्णालयाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचालकाच्या शेजारी बसलेल्या जयवंत सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या चालकास उपचारासाठी नेत असतानाच त्याचे निधन झाले. अपघातात इर्टिगा कारचा पूर्णपणे चेंदामेदा झाला. अपघाताचे वृत्त कळताच पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. गणेशोत्सवासाठी गावी येणाऱया चाकरमान्यांमुळे महामार्ग पुरता गजबजला आहे.