पुणे / प्रतिनिधी :
आषाढी एकादशीच्या दिवशी पुणे शहरातील सर्व कत्तलखाने पोलिसांनी बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेकडून पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. शहराध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
शहर शिवसेनेकडून पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शहर अध्यक्ष भानगिरे यांच्यासह सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे उपस्थित होते. शिवसेनेच्या निवेदनानुसार महाराष्ट्रातील समस्त वैष्णवांचा मेळा म्हणून मानल्या जाणाऱ्या आषाढी एकादशीच्या उत्सवानिमित्त पुणे शहरात शहरातील समस्त वारकरी संप्रदाय व नागरिक आषाढी एकादशीच्या दिवशी उत्साहाने, भक्तिभावाने या सोहळय़ात सहभागी होतात. या दिवशी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठुरायाची मनोभावे पूजाअर्चा केल्या जाते. या दिवशी पुणे शहरात सुरू असलेले कत्तलखाणे हे बंद करून समस्त वारकऱ्यांच्या भावनांना ठेच लागू नये. तसेच या दिवशी कोणत्याही ठिकाणी पशु हत्या होवू, नये याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पुणे शहरातील सर्व कत्तलखाने आषाढी एकादशीच्या महोत्सवाच्या निमित्ताने आपण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.








