ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Shivsena’s bow and arrow symbol frozen by Election Commission निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता धनुष्यबाण चिन्ह वापरू शकणार नाहीत. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत. उद्धव ठाकरे गटासाठी आतापर्यंतचा हा सर्वात मोठा धक्का आहे.
धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर आपापले दावे केले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली. पण शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणूक आयोगाला करता न आल्यामुळे धनुष्यबाण चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठविण्यात आलं. त्यामुळे दोन्ही गटांना हे चिन्ह आता वापरता येणार नाही. तसेच पक्षाचं नावही वापरता येणार नाही. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून केवळ आगामी निवडणुकांपुरता मर्यादित आहे. हा निर्णय बदलला जाऊ शकतो.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नसल्याने ते कोणतं चिन्हं निवडणार याची उत्सुकता शिवसैनिकांसह महाराष्ट्राला लागली आहे.








