खुन्याला आश्रय देणारा व्यक्ती गुन्हेगाराला आणखी गुन्हे करण्यास प्रोत्साहन देत असतो असा निशाणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा सभापती राहूल नार्वेकर यांना लगावला आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास झालेल्या दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना झापल्यानंतर संजय राऊत यांनी टिका केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले, “विधानसभा स्पीकर एखाद्या खुन्याला आश्रय देऊन त्याला आणखी गुन्हे करण्यास प्रोत्साहन देत असल्यासारखे वागत आहेत. त्यांना कायदा माहित नाही का?” असाही टोला संजय राऊत यांनी राहूल नार्वेकर यांना लगावला.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी आतापर्यंत स्पीकरच्या विरोधात अशी भुमिका सर्वोच्च न्यायालयाने कधीही घेतली नाही. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे- फडणवीस सरकारवर महाराष्ट्राची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे कडक शब्दात ताशेरे ओढले. विधानसभा अध्यक्षांना कठोर शब्दांत फटकारताना त्यांनी कानउघाडणी केली आहे.
मुख्य न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सभापती राहुल नार्वेकर यांचे प्रतिनिधीत्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना मंगळवारी याचिकांवर निर्णय घेण्याच्या कालमर्यादेबद्दल माहिती देण्यास सांगितले. तसेच अपात्रतेच्या कार्यवाहीवरील सुनावणीला “अनिश्चित काळासाठी विलंब” न करण्यासाठी वेळापत्रक मांडली जावी असेही न्यायालयाने सांगितले.