नार्वेकर स्वतःला वकील म्हणवतात पण त्यांच्याकडे खरंच सनद आहे की तेही एकनाथ शिंदेंसारखे मानद डॉक्टर आहेत हे तपासून पहावं लागेल असा मिष्किल टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे. तसेच गद्दार गँगकडून आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या बेकायदेशीर गोष्टी झालेल्या असून त्यामुळे त्यांच्यात मुजोरी आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणारा आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कुणाचे यावरही आमदार अपात्रतेच्या सुनावणीवेळीच निकाल देण्यात आला. शिवसेना पक्षाची 2000 साली मान्य करण्यात आलेली घटना दुरूस्ती अमान्य करण्यात येऊन पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा कोणताही अधिकार नाही असे म्हटले आहे.
तसेच, तसेच आपल्या निकालामध्ये राहूल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती योग्य असून त्यांनी बजावलेला व्हिप सुद्धा पात्र कायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार हे पात्रच आहेत असाही निकाल दिला गेला. या निकालामुळे शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह हे शिंदेच्या वाट्याला गेलं आहे.
यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर तसेच सभापती राहूल नार्वेकर यांच्यावर टिका सोडली आहे. त्याम्हणाल्या, “आमदार निधी उपभोगून झाला आहे. गद्दार गँगकडून आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या बेकायदेशीर गोष्टी केल्या आहेत. तरीही म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावला आहे. त्यामुळे सभापती राहूल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय आम्ही अंतिम मानत नाही.” असे त्या म्हणाल्या.
सभापती राहूल नार्वेकर यांच्यावर जोरदार टिका करताना सुषमा अंधारे यांनी “आम्हाला आश्चर्य याही गोष्टीचं आहे की राहूल नार्वेकर स्वतःला वकील म्हणवतात. पण त्यांच्याकडे खरंच त्याची सनद आहे काय ? का तेही एकनाथ शिंदेंसारखे मानद डॉक्टर आहेत? असा टोलाही त्यांनी लगावला.
निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आल्यावरून सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “त्रितालप्रमुख, स्वर्गलोक, पाताळलोक, भूलोक या तिन्हींचे प्रमुख मीच आहे, असा मजकूरही त्यावर छापला नाही हे नशीब. सर्वप्रकारच्या स्वायत्ता, गृहयंत्रणा आणि चिक्कार खोके उभे राहतात तेव्हा आपोआप देहबोलीमध्ये मुजोरपणा येतो. तो मुजोरपणा नीलम गोऱ्हेंपासून सगळ्यांमध्ये ठासून भरलेला दिसत आहे,”