काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्री मुश्रीफांचा सत्कार करून महाविकास आघाडीच्या तत्वांना तिलांजली दिल्याचा आरोप
कोल्हापूर प्रतिनिधी
महाविकास आघाडीचा धर्म हा शिवसेनेपुरताच मर्यादित आहे का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषेदतून केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा बुके देऊन सत्कार करून महाविकास आघाडीच्या तत्वांना तिलांजली दिल्याचा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात मंगळवारी सेना भवानात होणाऱ्या बैठकीत ही बाब पक्षश्रेष्टींच्या निदर्शनास आणणार असल्याचेही इंगवले यांनी सांगितले आहे.
इंगवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने राज्यात अडीच वर्षे सुशासन केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस या दोघांनाही सत्तेत सहभागाची संधी मिळाली नाही. भाजपच्या झंझावाता समोर गतप्राण होऊन पडलेल्या या पक्षांना शिवसेनेन संजीवनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला उकळी आली. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाजपची साथ देत अजित पवार यांच्या गटातून युतीच्या सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारले. खरंतर हसन मुश्रीफ यांचे माझे निकटचे संबंध असून देखील महाविकास आघाडीचा तत्वाच पालन करत त्यांचे स्वागत सुद्धा केल नाही. तरी देखील महाविकास आघाडीचे घटक असणारे जिह्याचे कॉंग्रेसचे नेत्यांनी थेट भेट घेऊन स्वागत केले. खर तर कोल्हापुरात त्यांच्या स्थानिक युत्या व आघाड्या असल्या तरी देखील महाविकास आघाडीचे सरकार पाडणाऱ्या या दोन्ही बंडखोर नेतृत्वाच्या कुठल्याही संबंधिताचे स्वागत एखाद्या महाविकास आघाडीतल्याच घटक पक्षांनी खुलेआम केलेल हे योग्य आहे का असा सवाल रविकिरण इंगवले यांनी केला. हे जर एका शिवसैनिकांनी केले असते तर त्याच्यावरती ताबडतोब कारवाई झाली असती. शिवसनेनेच नेहमी सोवळयात का रहायच? नेत्यांच्या हातात हात आणि निष्ठावंताना लाथ हे बरोबर नसल्याचेही इंगवले यांनी म्हटले आहे.
सोयीचे आणि स्टेलमेंटच्या राजकारणाला विरोध
जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा बँकमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते सोयीचे आणि स्टेलमेंटरचे राजकरण करत असून यास आपला विरोध आहे. शिवसेनेतील पक्षश्रेष्टींनी याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा हेच शिवसेना पुन्हा गिळंकृत करतील, अशी भितीही इंगवले यांनी व्यक्त केली. पक्षातील तळगळातील कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घ्याव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.
पक्षविरोधी विधान केल्याने राजघारण्यावर टीका
राज्यसभेच्या निवडणूकीवेळी माजी खासदार संभाजीराजे यांनी आपली उमेदवारी डावलल्यानेच शिवसेना पक्ष फुटल्याचा अरोप केला होता. त्यांनी पक्षविरोधी विधान केल्याने शिवसेना शहर प्रमुख म्हणून आपण खासदार संभाजीराजे यांच्यावर आरोप केले असल्याचे इंगवले यांनी स्पष्टीकरण दिले.









