शिवसेना उपनेता संजय पवार : टक्केवारीमुळचे रस्त्यांचा दर्जा निकृष्ठ झाल्याचा आरोप : टक्केवारीतील ‘दृश्यम’ शोधा : रविकिरण इंगवले
कोल्हापूर प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांचा ठेका, सोबतीला भ्रष्ट अधिकारी व त्यातच टक्केवारीची वसुली यामुळे रस्त्यांचे काम म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. केवळ टक्केवारीमुळेच शहरातील रस्त्यांचा दर्जा निकृष्ट होत असल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते संजय पवार यांनी केला. कोल्हापुरात गणरायांचे आगमन खड्ड्यातून झाले आता विसर्जनही खड्ड्यातूनच होणार का? असा जाब विचारत शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करत महापालिकेवर मोर्चा काढला.
शहरातील रस्त्यांची झालेल्या दयनिय आवस्थेवरून शिवसेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. खराब रस्त्यांबाबत ठेकेदारांवर काय कारवाई केली? शहरवासियांना चांगले रस्ते केंव्हा मिळणार अशा विविध प्रश्नांची सरबत्ती केली.
पवार म्हणाले, नव्याने केलेले रस्ते सहा महिनेही टिकत नाहीत. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे रस्ते वेळेत पुर्ण होत नाहीत. महापालिकेच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली जाते. पण तरीही अधिकारी ठेकेदांरावर कोणतीच कारवाई करत नाहीत. कोट्यावधी रुपयांच्या विकासाचे फलक लावण्रायांनी याचे उत्तर कोल्हापूरकरांना द्यावे, असा आरोप केला. भ्रष्टसाखळी, राजकीय दबाव या कारणाने कोल्हापूरकरांच्या पदरात आजतागायत फक्त विकासाचे स्वप्न बघण्याची वेळ आली आहे. याला पूर्णपणे महापालिकेचा निक्रियपणाच जबाबदार असल्याचे पवार यांनी सांगितले.
ज्या रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे त्या ठेकेदारांकडून पूर्ण रस्ते करून घ्यावेत, तसे न केल्यास ठेकदारांवर गुन्हे दाखल करावेत. ठेकेदारांबरोबरच दोषी अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी, त्यांच्या पगारातून पैसे वसूल करावेत्। अशी मागणी विजय देवणे यांनी केली. मागील वर्षी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये ठेकेदारावर एफआयआर दाखल झाला होता, पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुढे कारवाई झाली नाही, असा आरोप महेश उत्तुरे यांनी केला. यावेळी शहराध्यक्ष सुनिल मोदी, दिलिप देसाई, प्रतिज्ञा उत्तुरे, रीमा देशपांडे, सुशिल भांदीगिरे, अभिजीत पाटील, विराज पाटील, मंजित माने, प्रविण पालव, अभिजीत बुकशेठ आदी उपस्थित होते.
टक्केवारीमागील दृश्यम शोधा : रविकिरण इंगवले
शहरातील शंभर कोटीतील कोणते रस्ते झाले याचा महापालिकेने खुलासा करावा. शासनाकडून रस्त्यासाठी आलेले शंभर कोटी कुठे गेले? ठेकेदाराच्या पाठीमागे असणारी टक्केवारीच्या यंत्रणेमुळे शहरातील रस्ते टिकत नाहीत, ठेकादारांवर कारवाई होत नाही. शहराच्या विकासाच्या आड येणारा व महापालिकेच्या टक्केवारीमागील खरा ‘दृश्यम’ शोधून काढा, अशी मागणी शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केली