ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभा निवडणुकीत भाजपने (BJP) शिवसेना (Shivsena) उमेदवाराचा पराभव केल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. संजय राऊत (sanjay raut) यांनी शिवसेनेच्या पराभवासाठी अपक्षांना दोष देत दगा दिलेल्या आमदारांची यादीच पत्रकारांसमोर वाचून दाखवली तर विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी अपक्ष आमदारांचा निधी रोखण्याचा इशारा दिलाली आहे. तर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं अपक्ष आमदारांना बोलावून निधी देण्यावरून धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी शनिवारी केला होता. याच मुद्द्यावरून जळगाव मतदार संघाचे भाजपा आमदार संजय कुटे (sanjay kunte) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय कुटे म्हणाले की, “गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सरकार चालवलं जात आहे, ते पाहता केवळ अपक्ष आमदारच नव्हे,तर सत्तेतील आमदार देखील नाराज आहेत. प्रत्येकाला आपल्या मतदार संघासाठी काम करायचं असतं. मतदार संघांतील साडेतीन लाख मतदारांची आमदाराकडून अपेक्षा असते. त्यामुळे निधी न देण्याच्या धमकीला अपक्ष आमदार घाबरणारे नाहीत. अपक्ष असो किंवा भाजपाचे आमदारही अशा धमकीला घाबरणार नाहीत.”
कारण आमदार हे काही कुणाच्या घरचे गडी नाहीत. जसे संजय राऊत मातोश्रीचे घरगडी असतील किंवा विजय वडेट्टीवार हे सोनिया गांधींकडे घरगडी असतील. त्याप्रमाणे अपक्ष आमदार हे काही कुणाकडे घरगडी म्हणून काम करत नाहीत. त्यांचा स्वत:चा स्वाभिमान आहे,” अशा शब्दांत संजय कुटे यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.