ऑनलाईन टीम / नगर :
राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे (Rahul Rajale) यांच्यावर शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बेछूट गोळीबार झाला. या गोळीबारात राजळे जखमी झाले असून, त्यांच्यावर नगरच्या मॅक्सकेअर रूग्णालयात सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील घोडेगावजवळ (Ghodegaon) ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजळे हे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या गाडीने घारकडे निघाले होते. ते घोडेगाव परिसरात येताच अज्ञातांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. राजळे यांच्यावर तीन फायर करण्यात आले. एक गोळी राजळे यांच्या मांडीला लागली. दुसरी गोळी अंगाला चाटून गेली. तर तीसरी गोळी हुकल्याने राजळे थोडक्यात बचावले. गोळीबारानंतर घटनास्थळी जमलेल्या स्थानिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी मॅक्सकेअर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
राजकीय वैमनस्यातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नगर पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.








