उलटसुलट चर्चेला पुर्णविराम; सरकारकडून कोल्हापूरला कोट्यधीचा निधी; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भाकित केंव्हापासून करू लागले- मंडलिक
प्रतिनिधी कोल्हापूर
शिवसेनेचे (शिंदे गट) सर्व आमदार आणि खासदार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याबाबची चर्चा ही बिनबुडाची असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांना त्यांच्या मतदारसंघात कोट्यवधीचा निधी मिळाला असून यापुढे देखील मिळणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही माझ्या माध्यमातून २०० कोटींचा निधी मिळाला आहे. भविष्यात कोल्हापूरातील पंचगंगा प्रदुषणासह अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावरच लढविणार असल्याची स्पष्टोक्ती खासदार संजय
मंडलिक यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे वक्यव्य केले आहे. पण हे वक्तव्य म्हणजे केवळ अफवा असून जयंत पाटील भाकित कधीपासून करायला लागले ? हे पहावे लागेल, असा टोला खासदार मंडलिक यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघात कोट्यवधीचा निधी दिला आहे. त्यामुळे माझ्यासह सर्वजण शिवसेनेतूनच निवडणूक लढवतील. यामध्ये कोणतीही शंका नाही. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरात सिंचन योजनेसाठी ६५० कोटींचा निधी मिळाला असल्याचे मंडलिक यांनी स्पष्ट केले.
‘ शिवसेना’ आमचा पक्ष …’ धनुष्यबाण’ हेच चिन्ह !
न्यायालयाने ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत निर्णय दिला असून ते शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळाले आहे. त्यामुळे आमच्याकडे शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह असताना दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे खासदार मंडलिक यांनी स्पष्ट केले.
विकासाच्या राजमार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न
शिवसेना-भाजप युती सरकारच्या गेल्या ८ ते ९ महिन्यांच्या कावलावधीत जिल्ह्यात शेकडो कोटींची विकासकामे मार्गी लागली असून त्याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून मी समाधानी आहे. त्यामुळे शिवसेनेला सोडून अन्य पक्षात कशासाठी जाऊ ? असा प्रश्न उपस्थित करून केवळ विकासकामांच्या राजमार्गात खोडा घालण्यासाठीच या अफवा उठवल्या जात असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.
मी भाजप-शिवसेना युतीचाच उमेदवार
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार होतो. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी मला मदत केली. मी काँग्रेसमध्ये गेलो नव्हतो. २०२४ च्या निवडणुकीमध्येही मी युतीचा उमेदवार असेल. आणि भाजप- शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व नेते एकदिलाने निवडणूक लढवतील, असा आशावाद खासदार मंडलिक यांनी व्यक्त केला.









