बेळगाव : छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटना पिरनवाडी आयोजित हजरत अन्सारी जंगली पिरबाबा उरुसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने हरियाणाच्या सोनू कुमारला अवघ्या तिसऱ्या मिनिटात कुंद एकचाक डावावर चीत करुन उपस्थित 30 हजारहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. कुस्तीचे आश्रयदाते सतीश पाटील, रवी मुचंडीकर, सचिन गोरले, आप्पाजी मुचंडीकर, परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, कृष्णा बिदले व छत्रपती शिवाजी संघटना पिरनवाडी आदी मान्यवरांच्या हस्ते डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व राष्ट्रीय चॅम्पियन हरियाणाचा सोनू कुमार ही प्रमुख कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला शिवराज राक्षेने एकेरी पट काढून सोनूला खाली घेतले. पण सोनूने त्यातून सुटका करुन घेतली. लगेच पुन्हा शिवराज राक्षेने एकेरी पट काढत सोनूकुमारला खाली घेत एकलांगी भरत सवारी घालून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण ताकदिने मजबूत असलेल्या सोनू कुमारला फिरवणे कठीण गेले. त्यानंतर शिवराजने मानेवरचा कसा काढीत घुटण्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. त्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिसऱ्या मिनिटाला शिवराज राक्षेने कुंद एकचाक मारीत सोनूकुमारला आसमान दाखवित उपस्थित कुस्तीशौकीनांची मने जिंकली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कृष्णा बिदले व कुस्ती संघटनेच्या हस्ते उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व आंतरराष्ट्रीय चॅम्पियन बरकत अली हरियाणा यांच्यात लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला किरण भगतने एकेरी पट काढून बरकत अलीला खाली घेत एकलांगी भरून चीत करण्याचा प्रयत्न केला. त्यातून बरकत अलीने सुटका करुन घेतली. दुसऱ्या मिनिटाला किरण भगतने एकेरी पट काढून बरकत अलीला खाली घेत एकेरी कस चढवत (सिंगल नेलसन) बरकतला नकळत चीत करुन उपस्थित कुस्ती शौकीनांची वाहवाह मिळविली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व पंजाब केसरी सद्दाम पंजाब ही कुस्ती मृणाल हेब्बाळकर, अजित पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. पहिल्याच मिनिटाला कार्तिक काटेने पायाला चाट मारुन सद्दामला खाली घेत पायाला एकलांगी चढवून अवघ्या दीड मिनिटात सद्दामला आसमान दाखवून कार्तिक काटेने विजय संपादन केला. चौथ्या क्रमांकाची कुस्ती नागराज बशिडोणी व उमेश चव्हाण ही कुस्ती डाव प्रती डावाने झुंजली. वेळेअभावी ही कुस्ती गुणावर लावण्यात आली. त्यामध्ये नागराज बशिडोणीने दुहेरी पट काढून गुण मिळवित विजय मिळविला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन बाळू बोडकेने अमित कुमार दिल्लीवर गुणावर विजय मिळविला. सहाव्या क्रमांकाच्या गदेच्या कुस्तीत रोहित पाटीलने सुमीत हरियाणाला खालून डंकी मारत डंकी डावावर चीत करीत गदेचा मानकरी ठरला. पिराजी मुचंडीकर यांच्या हस्ते गदा देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
सातव्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंग्राळी व समाधान ही कुस्ती डाव प्रती डावाने झुंजली. वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. आठव्या क्रमांकाच्या मेंढ्याच्या कुस्तीत कुबेर पिरनवाडीने समाधान मानेला दोन्ही हाताचे हप्ते भरून हप्ते डावावरती विजय मिळवित मेंढ्याचे बक्षीस पटकाविले. नवव्या क्रमांकाची कुस्ती पवन चिकदीनकोप व किरण जाधव कोल्हापूर त्याचप्रमाणे दहाव्या क्रमांकाची कुस्ती विकास पवार कोल्हापूर व प्रेम कंग्राळी या कुस्त्या वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आल्या. आकर्षक कुस्तीत पार्थ कंग्राळीने निशांत राशिवडे याला एकलांगी डावावरती विजय मिळविला. त्याचप्रमाणे विनायक बेकवाड, प्रथमेश कंग्राळी, सुफियान सय्यद, राजू शिनोळी, रोहन कडोली, शंकर तिर्थकुंडे, गणेश फडके, मंथन सांबरा, हनुमंत गंदीगवाड, सनी राशिवडे, यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजय संपादन केला. महिलांच्या कुस्तीत स्वाती कडोली-लक्ष्मी बस्तवाड व प्रज्ञा कंग्राळी-समीक्षा यळ्ळूर ही कुस्ती वेळेअभावी बरोबरीत राहिली. तर राधिका संतीबस्तवाडने श्रावणी अंबेवाडीचा एकलांगी डावावर विजय मिळविला. प्रारंभी आखाड्याचे पूजन रवी मुचंडीकर यांनी केले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले. सागर साठे (कोल्हापूर) यांच्या सहकाऱ्यांच्या हलगी वादनाने सर्व कुस्ती शौकीनांना खेळवून ठेवले. बाळाराम पाटील, कृष्णा पाटील, हणमंत गुरव, बबन येळ्ळूर, सुधीर बिर्जे, गणपत बनोशी यांनी पंचगिरी केली.









