मुतगा कुस्ती मैदान : कार्तिक काटेचा विक्रांत कुमारवर प्रेक्षणीय विजय
युवराज पाटील , उमेश मजूकर/ सांबरा , बेळगाव
मुतगा येथे हनुमान यात्रेनिमित्त जय हनुमान कुस्तीगीर संघटना व निलजी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निकाली जंगी कुस्ती मैदानात विद्यमान महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंजाबच्या सुपींदरचा अवघ्या दीड मिनिटात एकेरी पट काढून धडक देत चीत करुन तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कार्तिक काटेने एकेरी हाताचा कस चढवून पायाला कस चढवित चीत करुन उपस्थित 25 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली.

या कुस्ती मैदानात प्रमुख लढत विद्यमान महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पंजाबचा भारतकुमार गोलू आखाड्याचा सुपींदर पंजाब ही कुस्ती ग्रा. पं. सदस्य, गावसुधारणा मंडळ, देवस्थान कमिटी, श्री हनुमान कुस्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लावण्यात आली. कुस्ती लागताच शिवराज राक्षेने सुपींदरला पटात घुसण्यासाठी प्रयत्नात होता. एक मिनिट झाल्यानंतर ताकदीचा अंदाज घेत असताना शिवराज राक्षेने एकेरी पट काढून धडक देत सुपींदरला कळत नकळत अस्मान दाखवित उपस्थित शौकिनांची मने जिंकली.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व हरियाणाचा राष्ट्रीय पदक विजेता विक्रांत कुमार ही कुस्ती श्री हनुमंत कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्याच मिनिटाला विक्रांतकुमारने एकेरी पट काढीत कार्तिक काटेला खाली घेतले. व घीस्स्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून कार्तिकने सुटका करुन घेतली. चौथ्या मिनिटाला कार्तिकने दुहेरी पट काढून विक्रांतला खाली घेत पायाची एकलांगी भरुन चीत करण्याचा प्रयत्न केला. पण विक्रांतने एकलांगी तोडून त्यातून सुटका करुन घेतली. आठव्या मिनिटाला कार्तिकने एकेरी पट काढून विक्रांतवर ताबा मिळवित एकचाक मारण्याचा प्रयत्न केला. त्यातून विक्रांत सूटणार असे दिसत असताना एकेरी हाताचा कस चढवून पायाला कस लावून विक्रांतला चारीमुंड्या चीत करीत उपस्थित कुस्तीशौकिनांची वाह वाह मिळविली.

तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व युवा महाराष्ट्र केसरी बाळू घोडके ही कुस्ती मुतगे कुस्ती समिती व ग्रामस्थ यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला युवा महाराष्ट्र केसरी बाळू घोडके पुणे याने एकेरी पट काढीत संगमेशला खाली घेत एकचाक मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण संगमेशने स्वत:ला सावरत डोक्यावरती सर्व समतोल करुन त्यातून निसटला. चौथ्या मिनिटाला पुन्हा बाळूने दुहेरी पट काढून संगमेशला खाली घेत झोळी बांधून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी संगमेशने त्यातून सुटका करुन घेतली. ही कुस्ती डावप्रतीडावाने झुंजली. पण वेळे अभावी कुस्ती पंचांनी गुणावरती घेण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये बाळू घोडकेने एकेरी पट काढून एकचाक मारुन संगमेशवर गुण मिळवित विजय मिळविला.
चौथ्या क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार (कार्वे) व विश्वजित रुपनर (कराड) ही कुस्ती डावप्रतीडावाने झुंजली पण वेळेअभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत अमोल नरळे (सांगली) याने विक्रम (शिनोळी) चा गुणावरती पराभव केला. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत किरण अष्टगी (कलखांब) याने गुत्त्याप्पा (दावणगेरी) चा घीस्सा डावावरती नेत्रदीपक विजय मिळविला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रेम जाधव (कंग्राळी) याने नवनाथ राक्षे (पुणे) वर झोळी बांधून झोळीवर चीत केले. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत पवन (चिकदिनकोप्प) व संकल्प (कंग्राळी) ही कुस्ती डावप्रतीडावाने झुंजली तर वेळेअभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आाली. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत सुशांत कंग्राळीने अजिंक्य चव्हानवर निकाली डावावरती विजय मिळविला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत कार्तिक इंगळगीने रुपेश इचलकरंजीचा गुणावरती विजय मिळविला. त्याचप्रमाणे नितीन बिराजदार (मुतगे) ने घीस्स्यावर, अमर बंबरगाने एकचाकवर, साईनाथ मार्केट यार्डने नागपट्टीवर, यश कंग्राळीने झोळीवर, विवेक यळ्ळूरने एकचाकवर, अभिनंदन मठपतीने झोळीवर, श्रीकांतने दुहेरी पट काढून, निखिल निट्टूरने एकचाकवर, ओंकार मुतगेने एकचाकवर, वैजनाथ कार्वेने एकलांगीवर विजय संपादन केले. त्याशिवाय शंकर तिर्थकुंडे, सारंग पाटील राशिवडे, आर. एन. चौगुले मुतगा, ऋषीकेश पाटील दुमडेवाडी, साई चापगाव, भावेश बिराजदार, ज्ञानेश्वर कडोली, बालाजी कंग्राळी, वरदन कंग्राळी, संभव शिनोळी, पार्थ पाटील कंग्राळी, प्रज्वल मजगाव, प्रणव कंग्राळी, निखिल शिनोळी, करण खादरवाडी, केशव सांबरा, सुजल मुतगे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजय संपादन केला.
आकर्षक कुस्तीत एका पायाने कमी असलेल्या परशराम पाटील मुतगाने शुभम निलजीचा अवघ्या एका मिनिटात घीस्सा डावावर विजय मिळवून उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. परशरामच्या या कुस्तीमुळे त्याला सर्व कुस्तीशौकिनांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
आखाड्याचे उद्घाटन व पूजन सातेरी पाटील यांनी केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन किरण पाटील, भालचंद्र पाटील व संजय पाटील यांनी केले. भावकेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन विशाल पाटील यांनी केले. हनुमान प्रतिमेचे पूजन भाऊसाहेब पाटील यांनी केले.
आखाड्याचे पंच म्हणून नवीन मुदगे, श्रीकांत मुदगा, सुधीर बिर्जे, विश्वनाथ पाटील, काशिनाथ पाटील, गणपत बन्नोशे, हनमंत पाटील, भावकाण्णा पाटील, कृष्णा पाटील कणबरगी, प्रकाश मुदोळ, शिवाजी पाटील यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले (राशिवडे) यांनी केले. तर ओमकार दाभाडे (यळगूड) यांनी आपल्या हलगीच्या तालावर सर्व कुस्तीशौकिनांना खिळवून ठेवले.
क्षणचित्रे…..
► विद्यमान महाराष्ट्र केसरी किताब पटकाविलेल्या शिवराज राक्षे याने कर्नाटकात प्रथमच मुतगे येथे मैदानात आल्याने त्यांना पाहण्यासाठी मैदानात हजारो कुस्तीशौकिनांनी उपस्थिती दर्शविली होती.
► मैदानात सर्व कुस्त्या निकाली झाल्याने कुस्तीशौकिनांनी समाधान व्यक्त केले.
► गावच्या दमण तलावात भव्य कुस्ती आखाडा तयार करण्यात आला होता. त्यामुळे कुस्तीशौकिनांना बसण्याची उत्तम सोय करुन देण्यात आली होती.
► पहिल्या दहा चटकदार कुस्त्यांच्या निकालामुळे कुस्तीशौकिनांनी समाधान व्यक्त केले.









