राजभर उत्तरप्रदेशचे राजकारण तापणार
वृत्तसंस्था/ लखनौ
स्वत:च्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे सुभासप प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा उत्तरप्रदेशच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवपाल सिंह यादव हे समाजवादी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा राजभर यांनी केला आहे.
समाजवादी पक्षाचे महासचिव शिवपाल यादव यांनी अलिकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या स्वत:च्या व्यक्तिगत संबंधांचा दाखला देत आपण कधीही योगींशी फोनवरून बोलू शकतो असे म्हटले होते. याचाच संदर्भ देत राजभर यांनी शिवपाल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे.
विधानसभेत बोलताना आदित्यनाथ यांनी शिवपाल यांना समाजवादी पक्षात वेळ वाया घालवू नका, लवकर भाजपमध्ये या असे अप्रत्यक्षपणे सुचविले होते. महाराष्ट्रात ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पडले, त्याचप्रमाणे उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षात दोन गट पडणार असल्याचा दावा राजभर यांनी केला आहे.









