वार्ताहर /शिवोली
म्हापसा येथून शिवोली परिसराला वीज पुरठा करणाऱया ट्रान्सफॉर्ममध्ये बिघाड झाल्याने शिवोलीतील रहिवाश्यांना अंधारात रहावे लागले.
रविवार दि. 11 रोजी रात्री 8 वा. अचानक वीज पुरवठा बंद झाला. त्यामुळे शिवोली परिसरात अंधार पसरलेला होता. येथील वीज उपकेंद्राचे फोन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मागणी करीत सतत वाजू लागले होते. रात्री अंदाजे 11.30 वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. पण सोमवारी सकाळीपासून वीजेचा लंपडाव सुरुच होता. त्यामुळे या परिसरातील व्यवसायिकांवर त्याचा परिणाम बराच झाला होता. दुपारी अंदाजे दोन वाजता वीजेचा पुरवठा बंद झाला. अनेक व्यवसायिकांनी वीजेचा पुरावठा सुरळीत होण्याची वाट पाहिली परंतू त्याचा उपयोग झाला नाही. वीजेवर काम करणारे टेलर्स, वेल्डर्स, झेरॉक्स काढणाऱयांनी आपली दुकाने संध्याकाळी बंद करुन घरचा रस्ता धरला.
वीजेच्या पुरवठय़ा संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी येथील उपकेंद्रावर भेट देऊन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला असता तेथील कर्मचाऱयांनी सांगितले की म्हापसा येथील शिवोली परिसराला वीज पुरवठा करणाऱया ट्रान्सफॉर्मला बिघाड झाल्याने वीज पुरवठा बंद झाला व तो सुरळीत करण्यासाठी खात्याचे इतरत प्रयत्न सुरु आहेत. अंदाजे सोमवारी रात्री पर्यंत सुरळीत वीज पुरवठा होऊ शकतो असे त्या कर्मचाऱयांनी सांगितले.
आईस्क्रीम विकणे बंद : संजय मोये
आम्ही मध्यम व्यवसायिक आहोत. शिवोलीत सतत पाच ते सहा वेळा वीज पुरवठा बंद होतो त्यामुळे आम्हाला अनेक व्यवसायिकांना त्याचे नुकसान सोसावे लागते. दूध व दूधाची उत्पादके वीज नसल्यामुळे खराब होतात. सतत होणाऱया वीजे अपुऱयापुरवठय़ामुळे मी आईस्क्रीम सारखे खाद्य पदार्थ विकणे बंद केले आहे. अनेक राजकीय व्यक्ती वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देतात पण ते नंतर विसरुन जातात असे दुकानदार संजय मोये यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.









