चार पोलिसांवर गोमेकॉत उपचार सुरू ; मुरुडेश्वरहून येताना वाहनाला अपघात

काणकोण : रविवारच्या सुटीचा फायदा घेऊन कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे श्री मुरुडेश्वर देवाचे दर्शन घेऊन परत येत असताना शेळी येथील ताणशी जंक्शनवर स्विफ्ट कार व मासेवाहू ट्रक याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात शिवोली येथील राकेश विर्नोडकर या वाहतूक पोलिसाचा जागीत अंत झाला. तो हणजुणे वाहतूक विभागाशी संलग्न होता. या भीषण अपघात अन्य चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या अपघातात कालिदास शेटेय (आगरवाडा-पेडणे), कृष्णा पालयेकर (पालये), प्रीतेश मांद्रेकर (हरमल) आणि राजेश पटेकर (मांद्रे) हे जखमी झाले आहेत. हे सर्वजण हणजुण पोलीस स्थानकावर पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. हा अपघात रविवारी 9 रोजी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजण्याच्या दरम्यान घडला. काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार क्रमांक जीए 11 ए 1805 आणि कारवारच्या दिशेने जाणारा मासेवाहू ट्रक क्र. एम एमच 08 डब्लू 8170 यांच्यात मडगाव-कारवार मार्गावरील पोळे येथील टोल नाक्याजवळच्या ताणशी जंक्शनजवळ हा अपघात घडला. स्विफ्ट कार कालिदास शेटये हा चालवित होता. या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. काणकोणच्या पोलिसांना या घटनेची खबर मिळताच त्वरित घटना स्थळी धाव घेऊन त्यानी पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन मरणोत्तर तपासणीसाठी पाठवून दिला. काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस पुढील तपास करीत आहेत .









