जातनिहाय गणती पुढे ढकलण्यासाठी वक्कलिग समाजाचा दबाव : शनिवारच्या समाजाच्या बैठकीत शिवकुमार उपस्थित
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात सोमवारपासून सुरू होणारी जातनिहाय गणती पुढे ढकलण्यात यावी यासाठी वक्कलिग समाजाचा दबाव, अनेक समुदायांकडून जातनिहाय गणतीवर असलेल्या असंतोष आणि आक्षेपांमुळे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
आदिचुंचनागिरी श्री निर्मलानंदनाथ स्वामीजी यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी बेंगळुरात झालेल्या वक्कलिग मठाधीश आणि राजकीय नेत्यांच्या बैठकीत जातीय जनगणना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार देखील उपस्थित होते. दरम्यान, वक्कलिग समाजाचे मठाधीश, राजकीय नेत्यांनी शिवकुमार यांच्याशी चर्चा केली. तसेच जातनिहाय गणती पुढे ढकलण्याचे काम केले पाहिजे. या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता.
मागासवर्गीय आयोगाच्या जात रकान्यांवरही वक्कलिग समाजासह अनेक समुदायांनी आक्षेप घेतला आहे. जातनिहाय गणती गोंधळाने भरलेली आहे. त्यामुळे ती पुढे ढकलावी, अशी मागणी अनेक समुदायांकडून करण्यात आली आहे. जातनिहाय गणतीमुळे काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्यासाठी शक्यता आहे. अनेक समुदाय जातनिहाय गणतीवर असंतोष आणि आक्षेप व्यक्त करत आहेत. पुढील निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीला गेले असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन जातनिहाय गणतीवरील गोंधळाबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.
जातनिहाय गणतीमुळे समाजात पुन्हा फूट पडू शकते. यामुळे निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अडचणी येऊ शकतात. या चर्चेमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये काही चिंता निर्माण झाली आहे. शक्तिशाली समुदाय काँग्रेस नेत्यांनी डी. के. शिवकुमार यांच्याशी बोलून उच्चकमांड स्तरावर चर्चा करून जातनिहाय गणती पुढे ढकलण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येते.









