कराड :
महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये गुणात्मकदृष्ट्या प्रथम क्रमांकावर आणि सहकार क्षेत्रामध्ये गेली 42 वर्षे दीपस्तंभाप्रमाणे आदर्शवत काम करीत असलेल्या शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई या संस्थेने सन 2024-25 या आर्थिक वर्षात 536 कोटींची संमिश्र व्यवसायवाढ करून मैलाचा दगड गाठला आहे, असे गौरवोद्गार संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष गोरख चव्हाण यांनी काढले.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये संस्थेने प्रत्येक स्तरावर उत्तम कामगिरी केल्याचे दिसून आले. 31 मार्च 2025 अखेर संस्थेच्या ठेवी 2908 कोटी व कर्ज 2217 कोटी असा एकूण 5125 कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा संस्थेने पार केला आहे. या आर्थिक वर्षात संस्थेला एकूण 60 कोटींचा ढोबळ नफा झालेला आहे. तसेच कर्जवसुलीच्या दृष्टीने अतिशय नियोजनबद्ध काम करून थकबाकी कमी करण्यात यश मिळवले आहे.
शिवकृपा पतपेढीचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून संस्थेच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणून त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण 102 शाखा, संस्थेची दोन क्षेत्रीय कार्यालये, दहा स्वतंत्र विभागीय कार्यालये व शिवकृपा भवन हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे रबाळे, नवी मुंबई येथे प्रशस्त प्रशासकीय कार्यालय कार्यरत आहे. सहकाराला अध्यात्माची जोड देऊन सहकार क्षेत्रात काम करीत असताना अर्थकारणाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणे हे शिवकृपाने आद्य कर्तव्य मानून संस्था समाजाभिमुख कार्य करीत आहे.
शिवकृपा पतपेढीस महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त झाला आहे. सन 2017 व 18 या सलग दोन्ही वर्षी राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार शिवकृपाने पटकावला आहे. सन 2016 सालचा प्रथम क्रमांकाचा बँको पतसंस्था पुरस्कार आणि प्रतिबिंब वार्षिक अहवाल स्पर्धा मुंबई विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणारा सहकार भूषण हा पुरस्कार देखील संस्थेस प्राप्त झाला आहे. अशा प्रकारे विविध मान्यवर संस्थांनी संस्थेस एकूण 19 पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. संस्थेच्या सभासदांना तत्पर, कार्यक्षम व दर्जेदार सेवा देता यावी, या हेतूने संस्थेचे कर्मचारी व प्रतिनिधींना शासन मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रातून वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.
संस्थेने ठेवी, कर्ज, थकबाकी व एनपीए या प्रत्येक स्तरावर केलेली उत्तम कामगिरी ही अत्यंत आनंददायी असल्याचे मत संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी यांनी व्यक्त केले. संस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्मचारी, प्रतिनिधी व संचालक मंडळ या सर्वांचे योगदान याकरिता महत्त्वपूर्ण आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच संस्थेस हा टप्पा पार करता आला आहे. संस्था या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करून गोरख चव्हाण यांनी सर्वांचे अभिनंदन केले.







