पावनक्षेत्र बडेकोळ्ळ मठात नागवीर स्वामींचा मुंज कार्यक्रमही थाटात : भाविकांची मोठी उपस्थिती : विविध धार्मिक-आध्यात्मिक कार्यक्रम

वार्ताहर /किणये
तारिहाळ येथील पावनक्षेत्र बडेकोळ्ळ मठाचे संस्थापक प. पू. शिवयोगी सदगुरू नागेंद्र स्वामी यांचा 86 वा पुण्यतिथी सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. मठात रविवारी दिवसभर विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी मठाधीश प. पू. शिवयोगी नागय्या स्वामी यांचे नातू नागवीर स्वामी यांचा अय्याचार मुंज सोहळाही थाटात व धार्मिक पद्धतीने पार पडला.
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बडेकोळ्ळ मठ आहे. येथे दर सोमवारी व प्रत्येक अमावास्येला भक्तांची गर्दी होते. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे हे पावनक्षेत्र आहे. घनदाट जंगलात योगसाधना करून प. पू. नागेंद्र स्वामी यांनी सर्वसामान्य भाविकांच्या उद्धाराचे कार्य केले. त्यांच्या समाधीचा हा बडेकोळ्ळ मठ चिंताग्रस्त व विविध समस्यांनी त्रस्त माणसाला सुखी व समाधानी बनविण्यासाठी लाभदायक
आहे. नागेंद्र स्वामी यांच्या पुण्यतिथी सोहळय़ानिमित्त रविवारी सकाळी महारुद्राभिषेक झाला. यावेळी विविध मठांचे मठाधीश उपस्थित होते. त्यानंतर नागवीर स्वामी यांच्या मुंज सोहळय़ाला सुरुवात झाली. हा शास्त्रीय व पौराणिक मुंज सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी मोठे गर्दी केली होती.
भक्तांना वाहनांची, पार्किंगची व्यवस्था स्वयंसेवकांनी केली होती. सकाळपासूनच बडेकोळ्ळ मठात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. प.पू. नागय्या स्वामी यांनी भक्तांचे स्वागत केले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू होते.
तरुण भारत पुरवणीचे कौतुक…

मठाचे संस्थापक प. पू. नागेंद्र स्वामी यांच्या 86 व्या पुण्यतिथी सोहळय़ानिमित्त तरुण भारत वृत्तपत्रातून विशेष पुरवणी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात पावनक्षेत्र बडेकोळ्ळ मठाचा संपूर्ण इतिहास तरुण भारतच्या माध्यमातून भक्तांपर्यंत पोहोचला. यामुळे तरुण भारत वृत्तपत्राचे विशेष कौतुक विविध मठाच्या मठाधीशांनी व भक्तांनी यावेळी केले.









