पुणे / प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारताकडे सोपविण्यास ब्रिटनच्या संसदेने मान्यता दिली आहे. मात्र, वाघनखे व जगदंब तलवार एकत्रितरीत्या आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून, काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच हा ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात आणण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या आंबेगाव (बु) येथील ‘शिवसृष्टी’ला मुनगंटीवार यांनी भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे पुन्हा भारतात आणण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. जगदंब तलवार आणण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर या दोन्ही ऐतिहासिक गोष्टी एकत्रितच भारतात परत आणता येतील. वाघनखांविषयी पत्रव्यवहाराची औपचारिकता इंग्लंडकडून पूर्ण करण्यात आली असून, ती घेऊन जाण्यास अनुमतीही देण्यात आली आहे, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, चालू वर्ष हे शिवराज्याभिषेक दिनाचे 350 वे वर्ष असून या वर्षभरात केंद्र सरकार, रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या मदतीने छत्रपती शिवरायांच्या काळातील ‘होन’ हे चलनी नाणे सोने, चांदी, तांब्याच्या धातूत सादर करीत स्मरणिका म्हणून प्रकाशित करणार आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी आमची चर्चा झाली असून, तीन धातूंचे शिवकालीन होन नागरिकांना स्मरणिका म्हणून खरेदी करता येईल. शिवराज्याभिषेक दिनाला 350 वर्षे लागले असून संपूर्ण वर्षभर राज्यासह देशात व विविध देशांत अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवकाळातील इतिहासाचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीकोनातून जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारण्याचा सरकारचा मानस आहे. बिहार, गुजरातप्रमाणे भव्यदिव्य स्वरुपात मुंबईत 30 एकर जागेत ते उभारण्यासाठी सुयोग्य जागेचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिलेला आहे. त्याबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सह्याद्रीच्या पट्टय़ात वाघ आणण्याचा विचार
दरम्यान, विदर्भातून सह्याद्रीच्या पट्टय़ात वाघ आणण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. त्या अनुषंगाने सहय़ाद्रीच्या पट्टय़ात वाघ आणण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.








