भिडे गुरुजींचा आदेश : शिवप्रतिष्ठानच्या बैठकीत सूचना
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (9 जून) रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर अनसूरकर गल्ली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी उपस्थित होते. हिंदू तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा तसेच देवदर्शन यात्रा काढण्यात यावी, असा आदेश गुरुजींनी यावेळी दिला. आपल्या संपूर्ण आयुष्यात शिवछत्रपतींनी परकीय सत्तांना धूळ चारली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वधर्म, स्वभाषा व संस्कृतीचा जाणीवपूर्वक हिंदवी स्वराज्यामध्ये वापर केला. अशा शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन सोहळा हिंदू तिथीनुसारच झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या सोहळ्यास आपल्या सांस्कृतिक वारकरी परंपरेनुसार असलेले भजनी मंडळ, अश्वपथक,शस्त्रधारी पथक, फेटेधारी पथक, रणरागिणी पथक, पालखी व शिवरायांची मूर्ती अशा नियोजनामध्ये देवदर्शन यात्रा काढण्यात यावी, असे ते म्हणाले. देहू-आळंदीहून वारकरी संप्रदायाच्या दिंड्या निघतात. पंढरपूरच्या दिशेने आषाढी वारीसाठी निघालेल्या या दिंड्यांदरम्यान धारकऱ्यांकडून पुणे येथे भक्ती-शक्ती संगम कार्यक्रम आयोजित केला जातो. 20 जून रोजी पुणे येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने धारकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आले. या बैठकीला प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, प्रचारक हिरामणी मुचंडीकर, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे यासह धारकरी उपस्थित होते.









