-विद्यापीठातील निवडणुकीची रणधुमाळी सुरु
-सुटाकडून एकत्रित निवडणूक लढविण्याचा आघाडीकडे प्रस्ताव
-आघाडीचे मात्र मौन
अहिल्या परकाळे,कोल्हापूर
Kolhapur Shivaji University Election 2022 : एक काळ असा होता की सुटाचे नाव जरी घेतले तरी शिवाजी विद्यापीठासह संस्थाचालक, प्राचार्यांना घाम फुटायचा. सुटाच्या दबावामुळेच वेळोवेळी विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणीही व्हायची. आजपर्यंत स्वबळावर निवडणूक लढविणाऱ्या सुटाने चक्क एकत्रित निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव विद्यापीठ विकास आघाडीसमोर ठेवला. याला विकास आघाडीचा अद्याप प्रतिसाद नाही. या घडामोडी पाहता सुटाची ताकद कमी झाली की काय? असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळातून उपस्थित होत आहे.
शिवाजी विद्यापीठाची निवडणूक असो, अथवा शैक्षणिक, प्रशासकीय प्रश्न नियमानुसारच निकाली निघालेच पाहिजेत, यासाठी सुटा नेहमीच आग्रही असते. अधिसभेतही चुकीच्या प्रस्तावांना मान्यता मिळाल्यास सुटाने केलेला सभात्याग गाजला आहे. एखादा प्रस्ताव कसा चुकीचा आहे, त्यामध्ये काय बदल करायला पाहिजेत, याची अभ्यासपूर्ण मांडणीही सुटाच्याच प्राध्यापकांनी करायची. सुटाच्या दबावामुळे अनेकवेळा विद्यापीठावर निर्णय बदलण्याची वेळ आली. प्राध्यापकांचा बुलंद आवाज असणाऱ्या सुटाने विद्यापीठ विकास आघाडीला एकत्रित निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव का दिला? अशी विचारणा होत आहे. सर्वच प्राध्यापकांना निवडणुकीची संधी मिळावी, यासाठी त्यांनी निवडणूक एकत्र लढवण्याचा प्रस्ताव दिला, हे खरे आहे. परंतू सुटा आणि विद्यापीठ आघाडीने निवडणूक एकत्रित लढवली तर प्राचार्य व संस्थाचालकांकडून प्राध्यापकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सुटा पुढे लढणार का? अशा चर्चा सुरु आहेत.
पूर्वी सुटाबरोबर रयत आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था एकत्रित लढल्या. सध्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्षच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील असून ते विद्यापीठ विकास आघाडीचे नेते आहेत. दुसरीकडे विकास आघाडीत असलेली रयत संस्था सुटाबरोबर लढणार नाही. मग सुटाच संस्थाचालकांबरोबर जाण्यासाठी आग्रही का? असा प्रश्न आहे.
हेही वाचा- कोल्हापुरात शिंदे गटाचा पहिला सरपंच विजयी
विद्यापीठ निवडणूक बिनविरोध होईल का?
शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी आणि सुटा यांच्यातच विद्यापीठ निवडणूकीची चुरस असते. एकमेका विरोधात प्रचार करीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा दोन्ही संघटना प्रयत्न करतात. सुटाचे विद्यापीठावर वर्चस्व नसले तरी दबाव मात्र कायम आहे. आता विद्यापीठ विकास आघाडी आणि सुटा एकत्र आल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी ‘लढा’ कायम राहील
सर्व प्राध्यापकांना निवडणुकीची संधी मिळावी, म्हणून सुटाने विद्यापीठ विकास आघाडीला एकत्रित निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतू लोकशाही विचाराच्या सुटाच्या कामाची पध्दत कधीही बदलणार नाही. प्राध्यापकांच्या सेवाशर्तीसह त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, ही सुटाची मुख्य भूमिका आहे.
डॉ. डी. एन. पाटील (प्रमुख्य कार्यवाह, सुटा)
हेही वाचा- …तर अलमट्टी वाढवण्याचा प्रयत्न हाणून पाडू: राजेंद्र पाटील-यड्रावकर
कोअर कमिटी सुटाच्या प्रस्तावावर निर्णय घेईल
विद्यापीठ विकास आघाडीसमोर एकत्रित निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव सुटाने ठेवला आहे. परंतू विद्यापीठ विकास आघाडीच्या कोअर कमिटीद्वारे बैठकीत सुटाच्या प्रस्तावावर चर्चा होईल. त्यानंतरच सुटाबरोबर विद्यापीठ निवडणूक लढवायची की नाही, याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील (सहकार्यवाहक, विद्यापीठ विकास आघाडी)