कोल्हापूर :
छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम देशवासियांचे प्रेरणास्थान आहे. शिवरायांचे नाव प्रत्येकाच्या नसानसात भिनले आहे. समाजात दुफळी माजवणाऱ्यांकडून व केवळ शिवाजी महाराजांवरचे खोटे प्रेम दाखविणाऱ्यांकडून शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्याचा घाट घातला जात आहे. शिवाजी विद्यापीठ हे नाव तमाम कोल्हापूरकरांची अस्मिता असून ते कदापीही बदलू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. जयसिंगराव पवार यांनी दिला आहे.
हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी केली आहे. यासाठी कोल्हापुरात भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. याच्या निषेधासाठी झालेल्या शिवप्रेमींच्या बैठकीत ते बोलत होते. दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे शुक्रवारी सायंकाळी ही बैठक झाली. विद्यापीठाच्या नामविस्ताराला कायमच विरोध राहणार असून नाव बदलण्याचा घाट घालाल तर ठोकून काढू, असा इशाराही तमाम शिवप्रेमींच्यावतीने यावेळी देण्यात आला. दरम्यान नामविस्तारासाठी प्रस्ताव देणाऱ्या आमदार, खासदार व मंत्र्यांचा तीव्र निषेध करण्यात आला.
डॉ. पवार म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे जेएनयू झाले. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे सीपीआर झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे सीएसटी झाले. भविष्यात नामविस्तार झाला तर शिवाजी विद्यापीठातून शिवाजी महाराजांचे नावही गायब होईल. शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला कायम विरोध राहणार आहे. याला शांततेने निवेदन देऊन प्रत्युत्तर दिले जाईल. नामविस्ताराला समस्त करवीरकरांचा विरोध असून आमच्या अस्मितेशी खेळू नये.
प्रा. भालबा विभुते महणाले, शिवरायांचे नाव सर्वांच्या मनात रहायचे असेल तर नाव बदलण्याचा प्रश्न उपस्थित करू नये. यामुळे शिवाजी महाराजांचे नाव मागे पडू शकते. डॉ. विलास पोवार म्हणाले, शिवाजी महाराजांविषयी आम्हाला प्रेम शिकवणारी ही माणसं कोण आहेत. शिवाजी महाराजांबद्दलचे खोटे प्रेम दाखवणाऱ्या प्रवृतीला सर्वांनी एकजुट होऊन ठेचून काढले पाहिजे.
प्रा. रमेश मोरे म्हणाले, नामविस्तार केले की काय होते हे माहीत आहे. नामविस्ताराचा डाव करणाऱ्यांना ठोकणे हा एकच पर्याय राहील. उद्योजक व्ही. बी. पाटील म्हणाले, नाव बदलण्याची मागणी करणे म्हणजे हा केवळ बालिशपणा आहे.
वसंतराव मुळीक म्हणाले, नाव बदलण्याची मागणी करणाऱ्यांनी आदी प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी काय केल ते पहावे. शिवाजी महाराज हे समस्त कोल्हापूरकरांचे दैवत असुन त्यांच्या अस्मितेला तडा जावू देणार नाही.
यावेळी माजी उपमहापौर आर. के. पोवार, प्रा. किसन कुराडे, प्रा. सुरेश शिप्पूरकर, अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. विवेक घाटगे, डॉ. विलास पवार, डॉ. वसंतराव मोरे, कॉ. चंद्रकांत यादव, बबनराव रानगे, संभाजी जगदाळे, शशिकांत पाटील, सरलाताई पाटील, शैलजा भोसले, पद्मजा तिवले, हर्षल सुर्वे, अभिषेक मिठारी, श्वेता परूळेकर, बाबा महाडिक, प्रा. जे. के. पवार, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.








