शिवाजी विद्यापीठाच्या निकालात चुका; विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण; कॉलेजकडून मागवली विद्यार्थ्यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युत्तरच्या परीक्षा सुरू आहेत. त्यापैकी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे अंतिम वर्षाचे निकाल जाहीर झाले आहेत. परंतू परीक्षा देवूनही विद्यार्थी अबसेंट असल्याचा किंवा पेपर देवूनही झिरो गुण असल्याचे निदर्शनास येताच विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. विद्यापीठाकडे तक्रार येताच जिल्हय़ातील सर्व महाविद्यालयाकडून संबंधीत विद्यार्थ्यांची माहिती मागवण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. येत्या तीन दिवसात निकालात दुरूस्ती करून पुन्हा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू आहेत. पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण किंवा नोकरीचा मार्ग सुकर व्हावा, म्हणून अंतिम वर्षाचा निकाल विद्यापीठाने तातडीने जाहीर केला आहे. परंतू इंग्रजी, विज्ञान, गणित, संख्याशास्त्रासह अन्य विषयांच्या 10 टक्के विद्यार्थ्यांच्या निकालात चुका झाल्या आहेत. काहींना झिरो गुण तर काहींना पेपर देवूनही अबसेंट असल्याचे निदर्शनास आले. जवळपास 500 विषयांच्या विद्यार्थ्यांना चुकीचा निकाल मिळाल्याने विद्यार्थी व महाविद्यालय प्रशासनात एकच गोंधळ उडाला. ज्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना चुकीचा निकाल मिळाला त्यांनी विद्यापीठातील परीक्षा विभागाशी संपर्क साधला. विद्यापीठाने पडताळणी करून संबंधीत विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे. बुधवारी सर्वच महाविद्यालयांकडून आपआपल्या विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठातील परीक्षा विभागाला पाठवण्याचे काम सुरू होते.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दिला दिलासा
परीक्षा देवूनही चुकीचा निकाल हाती पडल्याने विद्यार्थी व पालक अस्वस्थ झाले होते. परंतू महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना व्हॉटसऍप व एसएमएस करून विद्यार्थ्यांनी घाबरून जावू नये, तसेच महाविद्यालय किंवा विद्यापीठात जावू नये, तुमचे निकाल तीन दिवसात दुरूस्त करून मिळतील, असा संदेश पाठवून विद्यार्थ्यांना दिलासा दिला.
ओएमआर सीट भरताना चुका झाल्यामुळे निकालात गोंधळ
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाच्या सर्वच परीक्षा ऑफलाईन वस्तुनिष्ठ पध्दतीने ओएमआर शीटवर घेतल्या. ओएमआर शीट भरताना विद्यार्थ्यांकडून पीआरएन नंबर, सीट नंबर किंवा कॉलेज कोड व्यवस्थित भरला गेला नाही. किंवा महाविद्यालयाकडून ओएमआर शीट स्कॅनिंग करताना चुकीच्या पध्दतीने स्कॅनिंग झाल्यामुळे निकालामध्ये चुका झाल्या आहेत. सध्या महाविद्यालयाकडून माहिती घेत आहोत, येत्या तीन दिवसात निकालात दुरूस्ती करून पुन्हा निकाल जाहीर केला जाईल.
डॉ. अजितसिंह जाधव (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ)