प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur : शिवाजी विद्यापीठ व गोशिमा सबक्लस्टर यांचेमध्ये प्रशिक्षण,कौशल्य विकास आणि संशोधन या क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार करण्यात आला.या सामंजस्य करारांतर्गत विद्यार्थी केंद्रित प्रशिक्षण व कौशल्य आधारित अभ्यासक्रम,उद्योगाशी निगडित कार्यशाळा,उद्योग समस्या निर्गमित करण्याकरिता विविध संशोधन प्रकल्प,शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम,संशोधनाकरीता विविध शासकीय शिखर संस्थाकडे संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून आर्थिक मदत घेणे,पेटंटबाबत मार्गदर्शन,आणि विशिष्ट समस्या सोडविण्याशी संबंधित अनोख्या उपायांशी संबंधित स्टार्ट-अप किंवा स्पिन-ऑफ कंपनी स्थापन करणे,इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
यावेळी कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के यांनी हा सामंजस्य करार विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असून त्या अंतर्गत विद्यार्थी व शिक्षक हे तांत्रिक व उद्योगाशी निगडित नवनवीन ज्ञान निश्चितच अवगत करतील,असा ठाम विश्वास व्यक्त केला.प्र-कुलगुरु डॉ.पी.एस.पाटील यांनी या सामंजस्य करार अंतर्गत उद्योजकांनी विद्यापीठातील अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून त्यांनी उत्पादनांची गुणवत्ता वाढवावी,तसेच प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी या करार अंतर्गत विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत,असे सुचविले.
आयआयएफचे अध्यक्ष सचिन शिरगावकर यांनी गोशिमा सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सुरु असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.तसेच आगामी काळात शिक्षकांच्या उन्नतीकरिता विविध कोर्सेस तयार करून ते शिवाजी विद्यापीठातील शिक्षकांना उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.मोहन पंडितराव यांनी या करारामुळे कोल्हापूर उद्योग जगताला प्रशिक्षीत कर्मचारी उपलब्ध होतील,असे सांगितले. सूत्रसंचालन विद्यापीठ उद्योग कक्षाचे समन्वयक डॉ.एस.डी.डेळेकर यांनी केले.कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठातर्फे डॉ.एस.एच.ठकार ,डॉ.पी.डी .राऊत,डॉ.के.डी.सोनवणे;तसेच गोशिमा सब क्लस्टर तर्फे अजित आजरी,रणजित मोरे,अमोल यादव, विजय वसगडे,श्रीनिवास जोशी उपस्थित होते.
Previous Articleभारताने आफ्रिकन देशांसोबत भागीदारी वाढविणे गरजेचे
Next Article Sangli News : मुचंडी येथे साडेसात किलो गांजा जप्त









