-महाविद्यालयीन वर्ष सुरू होण्याआधीच राबविणार नियुक्तीची प्रकिया
-उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून परिपत्रक जाहीर
अहिल्या परकाळे,कोल्हापूर
नियमित प्राध्यापकांच्या बरोबरीने तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापक ज्ञानदान करतात. तरीही शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर त्यांची निवड प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होतेच पण विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होते. आता 2023-24 या नवीन शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारी महिन्यापासूनच सीएचबी प्राध्यापक निवड प्रक्रिया राबवून 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे कॉलेजच्या पहिल्या दिवशीच सीएचबी प्राध्यापक कॉलेजमध्ये हजर होऊन ज्ञानदान करणार आहेत.
राज्यातील सर्व विद्यापीठातील सीएचबी प्राध्यापक नियुक्तीसाठी नेहमीच दिरंगाई होत असते. परिणामी तीन चार महिने त्यांना मानधनापासून वंचित राहावे लागते. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये शासन आदेशानुसार विभागीय सहसंचालक, विद्यापीठ आणि महाविद्यालयांना निवड प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी लागेल. परिणामी नियमित प्राध्यापकांच्या बरोबरच सीएचबी प्राध्यापकांचे मानधन दर महिन्याला बँक खात्यावर जमा होईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सीएचबी प्राध्यापकांनी त्यांच्याकडे पुण्यातील बैठकीत अनेक मागण्या केल्या होत्या. याची दखल घेत मंत्री पाटील यांनी दिवाळीपूर्वी सीएचबीचे मानधन दिले. कॉलेज सुरू होण्यापूर्वी नियुक्ती मान्यता दिली, पहिल्या महिन्यापासून मानधन बँक खात्यावर जमा करण्यास मान्यता दिली. परिणामी प्राध्यापकांची आर्थिक चणचण कमी होईल, ऐवढेच नव्हे तर अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.
तासिका तत्वावरील प्राध्यापकांनी केलेल्या मानधन वाढीसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील सकारात्मक आहेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात एका तासाला 625 ऐवजी 1 हजार रुपये मानधन मिळण्याचे संकेत आहेत. सीएचबीचे मानधन वेळेत देण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एका नियमित प्राध्यापकाच्या बदल्यात दोन सीएचबी प्राध्यापकांची नेमणूक करून 9 तासिकांचा वर्कलोड देऊनही वर्कलोड शिल्लक राहिल्यास तो सीएचबी प्राध्यापकांना देण्याचे सूचविले आहे. सर्व रिक्तपदे भरण्यास मान्यता द्यावी, अशी संघटनांची मागणी होती. परंतू पुढच्या टप्यात ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
सीएचबी प्राध्यापक भरती प्रक्रिया प्रक्रिया तारीख
कार्यभार तपासणी 15 फेब्रुवारी
ना-हरकत प्रमाणपत्र मागणी 1 मार्च
ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करणे 15 मार्च
जाहिरात प्रसिध्द करणे 1 एप्रिल
अर्ज तपासणी, मुलाखत, उमेदवाराची निवड 15 एप्रिल
नेमणूक आदेश निर्गमित करणे 30 एप्रिल
विद्यापीठ मान्यता 30 मे
सीएचबी सेवा उपलब्धता 15 जून
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 463 प्राध्यापक पदे भरण्यास मान्यता
राज्यभरात 2088 तर शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील 463 प्राध्यापकांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार रोस्टर तपासणी पूर्ण झाली असून पुणे मागासवर्गीय कक्षाकडून एनओसी आल्यानंतर जाहीरात काढून प्राध्यापक भरती पूर्ण केली जाणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्षात सीएचबीचे मानधन वेळेत जमा होणार
सीएचबी प्राध्यापक नियुक्तीला उशिरा सुरूवात होत असल्याने आतापर्यंत त्यांचे मानधन देण्यास उशिर होत होता. आता शासन आदेशानुसार कॉलेज सुरू होण्यापूर्वीच सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करून, नवीन शैक्षणिक वर्षात प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यावर मानधन वेळेत जमा केले जाणार आहे.
डॉ. हेमंत कटरे (सहसंचालक, उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय)









