अहिल्या परकाळे,कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कातून घेतलेले लाखो रूपये खर्च करूनही जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. एकाचवेळी अनेक कलाप्रकाराचे सादरीकरण असल्याने विद्यार्थ्यांना एकाच कलाप्रकारात सहभाग नोंदवावा लागतो. एकच परीक्षक अनेक कलाप्रकाराचे परीक्षण करतात. तर एकच दिवस युवा महोत्सव असल्याने रात्री उशिर होतो. निवासाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना रात्री-अपरात्री प्रवास करीत घरी जाण्याशिवाय पर्याय नसतो.यामुळे प्रवासाचा त्रास होतो. सुविधांअभावी विद्यार्थ्यांचे हाल होतात, हा अनुभव यापुर्वी सहभागी महाविद्यालयांना आला आहे. यंदा तरी युवा महोत्सवामध्ये सुविधा मिळणार का? असा सवाल शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे.
या युवा महोत्सवात 14 प्रकारच्या कलांचे सादरीकरण होते. यातूनच अनेक अभिनेते, अभिनेत्री, गायक, वादक, चित्रकार, भविष्यात तयार होतात. त्यामुळे या युवा महोत्सवाला महत्व आहे. कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कलाकार दडलेला असतो. परंतू त्याला गरज असते ती प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळण्याची. महाविद्यालयीन युवा महोत्सवातून या विद्यार्थ्यांना रंगमंच उपलब्ध होतो. सकाळी लवकर उठून युवा महोत्सवासाठी आलेले विद्यार्थी थकलेले असतात. तरीही आपला आणि आपल्या महाविद्यालयाला बक्षीस मिळावे म्हणून जीव तोडून कलेचे सादरीकरण करतात. रंगीत तालीम आणि प्रत्यक्षात सादरीकरण करून थकलेल्या विद्यार्थ्यांना युवा महोत्सव संपल्यानंतर रात्री उशिरा प्रवास करीत घर गाठावे लागते. विशेषत: विद्यार्थीनींना पालकांच्या ताब्यात दिल्याशिवाय संबंधित कॉलेजच्या शिक्षकांना घरी जाता येत नाही. त्यामुळे युवा महोत्सवाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विश्रांतीसाठी निवासाची व्यवस्था आणि जेवणासह सर्वच सुविधा द्याव्यात. विद्यार्थ्यांना चेंजिंग रूमची उत्तम सुविधा असावी. युवा महोत्सवाच्या कागदावरील नियोजनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिक्षक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.
जेवणाची व्यवस्था कोलमडते
विद्यार्थ्यांना युवा महोत्सवला आल्यानंतर जेवणासाठी बाहेर जाता येत नाही. तेंव्हा यजमान महाविद्यालयाने दिलेल्या जेवणावरच अवलंबून राहावे लागते. परंतू अनेकदा विद्यार्थ्यांना जेवण मिळत नाही. काहीवेळा जेवणाचा दर्जाही चांगला नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पैसे खर्च करून बाहेरचे काहीतरी खावे लागते. त्यामुळे ज्या महाविद्यालयात युवा महोत्सव आहे, त्या महाविद्यालयाने जेवणाची उत्तम व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
युवा महोत्सवावेळी परीक्षा नसावी
युवा महोत्सवाच्या दरम्यान काही अभ्यासक्रमांची परीक्षा सुरू असेल तर संबंधीत अभ्यासक्रमांचे विद्यार्थी इच्छा असूनही युवा महोत्सवात सहभागी होवू शकत नाहीत. त्यामुळे युवा महोत्सवा दरम्यान कोणत्याही अभ्यासक्रमाची परीक्षा असू नयेत, याची काळजी विद्यापीठ प्रशासनाने घेतली पाहिजे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
वसतिगृह व उत्तम सुविधा देणाऱ्या कॉलेजवरच युवा महोत्सव
युवा महोत्सवासाठी आलेल्या संघांना राहण्याची व जेवनाची उत्तम सुविधा मिळावी. यासाठी ज्या महाविद्यालयावर मुला-मुलींचे वसतिगृह, जेवणाची व नाष्ट्याची उत्तम सुविधा असणाऱ्या महाविद्यालयावरच युवा महोत्सव घेण्यास परवानगी देणार. त्यामुळे विद्यार्थ्यांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागणार नाही. तसेच प्रत्येक कला प्रकाराचा परीक्षक वेगवेगळा असेल, याची दखल यंदा शिवाजी विद्यापीठ घेणार आहे.
डॉ. पी. टी. गायकवाड (संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, शिवाजी विद्यापीठ)