प्रतिनिधी,कोल्हापूर
गणेशोत्सवाच्यानिमित्ताने सजिव देखाव्यांतून ऐतिहासिक घटना व लढाईचा रोमांचकारी इतिहास गणेशभक्तांसमोर मांडण्यासाठी अवघी शिवाजी पेठ सज्ज झाली आहे.सोमवार 25 रोजीच्या रात्री 8 वाजचा मंडळांनी मंडपाचे पडदे वर जातील आणि सजिव देखाव्यांना सुरूवात होईल.या देखाव्यांमधून हिंदवी स्वराज्यासाठी धारातिर्थी पडलेल्या शुरवीर मावळ्यांची शौर्यगाथा गणेशभक्तांमोर उघडणार आहे.या देखाव्यांच्या रंगीत तालमी दोन दिवसांपासून तालीम, मंडळांमध्ये सुरू आहेत.सर्वच मंडळांचे प्रत्येक रात्री देखाव्यांचे 15 प्रयोग करण्याचे नियोजन आहे.या देखाव्यांसोबत खळखळून हसवणारे देखावेही पहायला मिळणार आहे.
प्रत्येक गणेशोत्सवात राजारामपुरीतील तांत्रिक व प्रबोधनात्मक देखावे पाहिल्यानंतर गणेशभक्त पेठापेठांमधील सजीव देखाव्यांकडे वळत असतात. त्यामुळे राजारामपुरीप्रमाणेच पेठांपेठांमधील रस्तेही गर्दीने फूलून जातात.यंदा शिवाजी पेठेतील मंडळांनी तर हजारो नव्हे तर लाखो गणेशभक्त आकृष्ट होतील,अशी सजीव देखाव्यांनी निर्मिती केली आहे.दैवज्ञ बोर्डींगमागे शिवाजी पेठेत प्रवेश केल्यानंतर अवचितपीर तालमीकडून सादर केला जाणारा वीर शिवा काशीद हा सजीव देखावा दिसेल.या देखाव्यात तालमीचे कार्यकर्ते स्वप्निल चौगुले हे शिवा काशीद यांची भूमिका साकारणार आहेत.निवृत्ती चौकातील नामवंत गोल्डस्टार स्पोर्टस् असोसिएशनने पावनखिंड हा रोमांचकारी सजीव देखावा बनवला आहे.पावनखिंडीतील लढाईवर अधारीत देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराज,नरवीर बाजीप्रभू देशपांडे,फजल खान हे रंगमंचावर अवतरणार आहेत.या देखाव्यांचा आनंद लुटल्यानंतर साकोली कॉर्नरजवळील हिंदवी स्पोर्टस्ने गणेशमूर्तीसमोरील सेल्फी पॉईंट वाटावा तसेच कॅडीड फोटो शुट करता येतील, अशी उभी केलेली लाईट पाहता येईल.दीडशे फुट लांब ही लाईट असून सर्वांना बिनधास्तपणे सेल्फीसह सामुहिक फोटो घेता येणार आहेत.ताराबाई रोडवरील वखार ग्रुपचा कांतारा हा सजीव देखावाही आनंद देणारा आहे.विनोदी स्टाईलच्या देखाव्यातून सामान्य लोक व महाराज यांच्यातील संवाद ऐकवून हसवले जाणार आहे.
रंकाळा टॉवरला लागूनच उमेश कांदेकर युवा मंचकडून सादर केला जात असलेला विशालशैल्य विशाळगड व ताराबाई रोडवरील मित्र प्रेम मंडळाकडून मांडण्यात येणारा नायनाट देशद्रोह्यांचा… हा रोमांचकारी देखावा सहकुटुंब सहपरिवार पहावा, असाच आहे. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेसह गानिमाक्याची अनुभूती या दोन्ही देखाव्यातून मिळणार आहे. दोन्ही देखाव्यांसाठी मोठमोठे रंगमंच उभारले असून त्यातून कथा, व्यथा व गाथा याची प्रचितीही अनुभवता येणार आहे. उभा मारूती चौकातून बुवा चौकात गेल्यानंतर येथील जयशिवराय बुवा चौक या मंडळाकडून सादर केला जाणारा विनोदी देखावाही गणेशभक्तांना हसवणार आहे. मात्र मंडळाने देखाव्याचा विषय व त्यातील किस्स्यांबाबत गुप्तता पाळली आहे. गणेशोत्सवात चांदीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा पायंडा पाडलेल्या नाथा गोळे तालमीने तर आकर्षक असा भव्य गणेश दरबार उभारला आहे. या दरबारात 1997 साली 52 किलो चांदीमध्ये बालाजीच्या रूपात बनवून घेतलेली गणेशमूर्तीं विराजमान केली जाणार आहे.वैशिष्ठ्य म्हणजे तालमीने चांदीची गणेशमूर्ती बनवल्यानंतर मातीची उंच गणेशमूर्तीं बसवण्याचे टाळत पाणी प्रदुषण रोखण्याच्या चळवळीला बळ दिले आहे.
गणेशमूर्तींला तब्बल 35 किलो चांदीचे दागिने…
फिरंगाई तालीम नजिकच्या काळकाई गल्लीतील प्रतापसिंह तरूण मंडळाने गणेशमूर्तींसाठी 10 किलो चांदीत नक्षीदार प्रभावळ, 6 किलो चांदीत कमल फुलांसह अन्य दागिने बनवून घेतली आहे. त्यामुळे पूर्वीच्या 19 चांदीच्या दागिन्यात 16 किलो दागिन्यांची आता भर पडली आहे.
देखाव्यातून राजर्षी शाहूंच्या विशेष कार्याची मांडणी…
शिवाजी पेठ व मंगळवार पेठेच्या बाऊंड्रीवर असलेल्या लाड चौकातील जय शिवराय फुटबॉल प्लेअर तरूण मंडळ देखाव्यातून राजर्षी शाहूंच्या विशेष कार्याची मांडणी केली आहे.इतिहासाचे अभ्यासक राम यादव लिखित शिवभक्त राजर्षी शाहू असे देखाव्याचे नाव आहे.शाहूंनी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा पुण्यामध्ये उभा करण्यासाठी ब्रिटीश युवराज प्रिन्सऑफ वेल्सकडून केलेली पायीभरणी देखाव्यातून दाखवली जाणार आहे.राजर्षी शाहूंनी शिवचरित्र कसे लिहून घेतले,सिंधुदूर्ग किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिराला बांधलेला सभामंडप हे पहायला मिळणार आहे.