सभापती रमेश तवडकर यांचे प्रतिपादन : जाती-धर्मावरून तेढाचे प्रयत्न चिंताजनक,बेतूल येथून शिवशौर्य यात्रेला प्रारंभ
कुंकळ्ळी : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने आयोजित केलेल्या शिवशौर्य यात्रेला बेतूल येथून प्रारंभ करताना कणखर भूमिका घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली पराक्रमांची आठवण सभापती रमेश तवडकर यांनी करून दिली. ते म्हणाले की, आपली भारतीय संस्कृती आणि आपला देश सांभाळायचा असेल, तर शिवाजी महाराजांच्या विचारांचे आचरण होणे आवश्यक आहे. जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तवडकर यांनी चिंता व्यक्त केली. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण त्याचा दुऊपयोग करू पाहणाऱ्या विकृतीचे लोकही डोके वर काढत आहेत. शिवाजी महाराजांच्या विचारांची आज आवश्यकता आहे, असे तवडकर म्हणाले. त्यांच्या हस्ते भगवा झेडा दाखवून शिवशौर्य यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सारा परिसर भगवामय झाला होता. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नागरिक एकत्र येऊन त्यांनी ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्यामुळे बेतूलचा परिसर दुमदुमून गेला. विश्व हिंदू परिषदेचे गोवा प्रदेश अध्यक्ष मोहन आमशेकर, बजरंग दलाचे संयोजक बनेश नाईक, विराज देसाई व इतर पदाधिकारी तसेच अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.
दुग्धशर्करा योग : आमशेकर
मोहन आमशेकर यांनी तमाम गोमंतकीयांना जातीभेद, मतभेद बाजूला सारून शिवशौर्य यात्रेत सामील व्हा, असे आवाहन केले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला व राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत व विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. हा दुग्धशर्करा योग आहे, असे ते म्हणाले.
म्हापशात 8 रोजी सांगता
शिवशौर्य यात्रा काढण्याचे ठरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या बेतूल किल्ल्यावरून ती सुरू करण्याचा संकल्प विहिंप व बजरंग दलाने केला. ही यात्रा संपूर्ण गोव्यात फिरून ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी धर्मांध मिशनऱ्यांचा खात्मा केला होता त्या म्हापसा शहरात 8 ऑक्टोबर रोजी यात्रेचा समारोप होणार आहे, अशी माहिती आमशेकर यांनी दिली. तत्पूर्वी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते सकाळी बेतूल किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी मोहन आमशेकर व विहिंपचे इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.