छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात होणार स्वागत
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ मूर्ती व स्मारकाचे अनावरण 8 मार्च रोजी टोकियो (जपान) येथे होणार आहे. हा भव्यदिव्य सोहळा जपानमधील हजारो शिवप्रेमी व मराठी बांधवांच्या साक्षीने होणार आहे. या शिवमूर्तीची देशातील बारा राज्यातून रथयात्रा काढली जात असून शनिवार दि. 18 रोजी शिवस्वराज्य रथयात्रा बेळगावमध्ये येत आहे. या रथयात्रेचे बेळगावमध्ये थाटात स्वागत केले जाणार आहे. सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, शहापूर येथे यात्रेचे स्वागत होईल.
3 मीटर उंच व 3 मीटर लांब अशी अश्वारुढ शिवमूर्ती टोकियो शहरात बसविली जाणार आहे. अत्यंत सुबक, सुरेख अशी ही मूर्ती शिल्पकार विवेक खटावकर यांनी घडविली आहे. जपानसारख्या देशामध्ये ही शिवमूर्ती बसविली जाणार असल्याने प्रत्येक शिवप्रेमीसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मूर्ती प्रतिष्ठापनेपूर्वी भारतातील बारा राज्यांच्या प्रमुख शहरांमधून रथयात्रा काढली जात आहे.
‘आम्ही पुणेकर’, जपान येथील एडोगावा इंडिया कल्चरल सेंटर, ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अक्षोहिणी प्रायव्हेट लिमिटेड, मराठा बिझनेसमन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने रथयात्रा काढली जात आहे. जपानस्थित स्मारकामध्ये भारतीय इतिहास संशोधक मंडळ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अनेक मौल्यवान पुस्तकांसह इ. स. 1620 ते 1840 दरम्यानची मौल्यवान पत्रे आणि पेंटींगच्या खऱ्या प्रती ठेवल्या जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.









