दोन दिवसांत 350 हून अधिक कलाकारांची रंगभूषा
बेळगाव : चित्ररथ मिरवणुकीत सहभागी कलाकारांची मोफत रंगभूषा करावी या उद्देशाने म. ए. समिती, श्रीराम सेना हिंदुस्थान व सकल मराठा समाजाच्यावतीने व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी 250 हून अधिक कलाकारांची रंगभूषा करण्यात आली. यामुळे चित्ररथ मिरवणुकीतील मंडळांनी आयोजकांचे आभार मानले. वडगावसह बेळगावमधील कलाकारांसाठी म. ए. समितीच्यावतीने मागील चार वर्षांपासून मोफत रंगभूषा केली जात आहे. बुधवारी वडगाव येथे चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी 100 हून अधिक कलाकारांची रंगभूषा करण्यात आली. तर गुरुवारी बेळगावच्या 250 हून अधिक कलाकारांची मोफत रंगभूषा करण्यात आली. ऐश्वर्या पोटे व त्यांच्या संघाकडून चित्ररथ मिरवणुकीतील कलाकारांची रंगभूषा करण्यात आली.









