हुबळी एफसी उपविजेता, आदर्श उत्कृष्ट खेळाडू
बेळगाव : शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लब आयोजित शिवाजी कॉलनी चषक निमंत्रीतांच्या सेवन ए साईडच्या अंतिम सामन्यात शिवाजी कॉलनी एफसीने हुबळी एफसीचा 2-1 असा पराभव करुन शिवाजी कॉलनी चषक पटकाविला. आदर्शला उत्कृष्ट खेळाडू तर रोहितला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. शिवाजी कॉलनी येथील फुटबॉल मैदानावरती घेण्यात आलेल्या या फुटबॉल स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवाजी कॉलनी एफसी संघाने सावंतवाडी एफसी संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्याच्या 17 व्या मिनिटाला शिवाजी कॉलनीच्या सुजलने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात 27 व्या मिनिटाला सुजलच्या पासवर मोनीतने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात सावंतवाडी संघाने गोल करण्याची संधी दवडल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात हुबळी एफसीने साईराज युथ संघाचा 2-0 असा पराभव केला. सामन्याच्या 10 व्या मिनिटाला हुबळीच्या राहुलने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 22 व्या मिनिटाला हुबळीच्या रितेशच्या पासवर राहुलने 2 दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली.
अंतिम सामना शिवाजी कॉलनी एफसी व हुबळी एफसी यांच्यात झाला. याचे उद्घाटन राकेश कांबळे, पवन कांबळे, सागर भोसले व मनोज खांडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करुन करण्यात आले. या सामन्यात शिवाजी कॉलनीने 2-1 असा हुबळी संघावर मात करुन विजयी संपादन केला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला शिवाजी कालनीच्या राहुलच्या पासवरती सुजलने पहिला गोल केला. नवव्या मिनिटाला हुबळीच्या आदर्शने बरोबरीचा गोल करुन सामन्यात रंगत निर्माण केली. दुसऱ्या सत्रात 16 व्या मिनिटाला राहुलने गोल करुन 2-1 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर हुबळी संघाने गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही.
शेवटी सामना शिवाजी कॉलनी एफसी संघाने जिंकला. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चषक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आदर्श हुबळी, उत्कृष्ट डिफेंडर राहुल-शिवाजी कॉलनी, उत्कृष्ट गोलरक्षक रोहीत व शिस्तबद्ध संघ म्हणून साईराज युथ यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. यावेळी परशुराम जाधव, विक्रम कदम, प्रशांत पवार, संतोष दळवी, राहुल गायकवाड, तेजस पाटील, अक्षय कांबळे आदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आदित्य भोसले, अभिषेक कांबळे, विनायक खांडेकर, प्रथमेश अक्षीमनी, एस. जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.









