क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लब, प्लेजंट कॉन्व्हेंट, डोनाल्ड डक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी कॉलनी चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत केएलएस संघाने संत मीराचा, मुलींच्या गटात संत मीराने डीपीचा तर प्राथमिक गटात संत मीराने चिटणीस संघाचा पराभव करून शिवाजी कॉलनी चषक पटकाविला. संत मीराने मुलींच्या विभागात दुहेरी मुकुट पटकाविला. चैतन्य रामगुरवाडी, पोल्मा, सेजल भावी यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
लेले मैदानावर खेळविण्यात आलेल्या या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सकाळी खेळविण्यात आलेल्या मुलांच्या सुपरलीग सामन्यात केएलएसने भारती विद्याभवनचा 10-0 असा पराभव केला तर दुसऱया सामन्यात संत मीराने अमृता विद्यालयाला 1-1 असे बरोबरीत रोखले.
दुपारी खेळविण्यात आलेल्या प्राथमिक गटातील 14 वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात संत मीरा संघाने जीजी चिटणीस संघाचा 1-0 असा पराभव केला. दीपिकाने पेनल्टीवर एकमेव विजयी गोल नोंदवला.
17 वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात संत मीरा संघाने डीपी संघाचा टायबेकरमध्ये 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. निर्धारीत वेळेत संत मीराचा गोल रेणुवीराने तर डीपी स्कूलचा गोल अवनी चौगुलेने नोंदवत 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यामुळे पंचानी टायबेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये 3-2 अशा गोलफरकाने संत मीराने विजय संपादन केला. संत मीरातर्फे रेणुवीरा व गोपीका यांनी तर डीपीतर्फे विभावरी देसाईने गोल केला.
मुलांच्या शेवटच्या सुपर लिग सामन्यात केएलएसने संत मीराचा 1-0 असा पराभव केला. शेवटच्या सामन्यात केएलएसने खेळ संपण्यास काही मिनिटे बाकी असताना साकीबने जागीरदार गोल नोंदवला. या सामन्यात संत मीराच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले.
सुपरलीग फेरीत केएलएसने 9 गुणांसह विजेतेपद पटकाविले तर 4 गुण व गोलांच्या सरासरीवर संत मीराने दुसरा क्रमांक, 4 गुणांसह अमृता विद्यालयाने तिसरा क्रमांक पटकाविला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे आरोग्य खात्याचे अधिकारी शशिकांत मास्तीहोळी, शिवाजी जाधव, आनंद चव्हाण, किशोर पोटजाळे, यशोधर जैन, एस. एस. नरगोडी, विक्रम देसाई, गोपाळ खांडे, पवन कांबळे, शेखर कांबळे, सचिन धामणेकर, प्रसाद सुभेदार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या केएलएस, संत मीरा, उपविजेत्या डीपी, चिटणीस, संत मीरा संघाला, तर तृतीय क्रमांक पटकाविलेल्या संघाला चषक, प्रमाणपत्र व पदके देवून गौरविण्यात आले. 14 वर्षाखालील गटात उत्कृष्ट खेळाडू सेजल बावी चिटणीस, उत्कृष्ट गोलरक्षक संतोषी पाटील डीपी, स्पर्धेत सर्वाधिक गोल दीपिका संत मीरा, उगवता खेळाडू तनुषा डीपी, 17 वर्षाखालील मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळाडू पोल्मा डीपी स्कूल, उत्कृष्ट गोलरक्षक दिव्या घोरी डीपी, स्पर्धेत सर्वाधिक गोल रेणुवीरा संत मीरा, उगवते खेळाडू सलोनी संत मीरा, मुलांच्या गटात उत्कृष्ट खेळाडू चैतन्य रामगुरवाडी केएलएस, उत्कृष्ट गोलरक्षक स्वरूप हलगेकर संत मीरा, सर्वाधिक गोल नमित पाटील केएलएस, उगवता खेळाडू प्रथम भारती विद्याभवन यांना चषक देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे पंच म्हणून विजय रेडेकर, विरेश बेन्नर, योगेश सांगावकर, कौशिक पाटील, उमेश मजुकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजी कॉलनीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. संतोष दळवी यांनी सूत्रसंचालन केले.