कोल्हापूर / अवधुत शिंदे :
कोल्हापूर– रत्नागिरी महामार्गावरील छत्रपती शिवाजी पूल ते वडणगे फाटा रस्ता अपघातांचे ब्लॅकस्पॉट झाला आहे. सध्या परिक्षा संपल्यामुळे जोतिबा, पन्हाळा येथील पर्यटक आणि कोकणातून येणाऱ्या वाहतुकीचा ताण या रस्त्यावर पडत असल्यामुळे मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. या मार्गाचे रुंदीकरणच झाले नसल्यामुळे तसेच काही व्यावसायिकांनी या मार्गावर अतिक्रमण केल्यामुळे वाढत्या वाहनांच्या तुलनेत रस्ता अरुंद पडत आहे. यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक झाले आहे.
रत्नागिरी कोल्हापूरला जोडणाऱ्या राज्यमार्गावर शिवाजी पुल ते वडणगे मार्गावर वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. वडणगे, आंबेवाडी, चिखली, निगवे या भागातील अनेक नागरिक कामानिमित्त दररोज शहरात ये–जा करत असतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच सध्या शाळांना सुट्या पडत असल्यामुळे पर्यटकांचाही ओघ वाढला असल्याने कोंडीचा प्रश्न गंभीर ठरत आहे. अनेकदा शिवाजी पूलाकडून पवार पाणंदकडे वळताना येथे छोटे मोठे अपघात होत आहेत. यामुळे पेट्रोल पंप परिसरात दोन्ही बाजूला गतिरोधक करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. शिवाजी पूल ओलंडल्यानंतर पवार पाणंदकडे वळताना वाहनांची गर्दी होते. काही वाहनचालक घाईगडबडीत चुकीच्या पद्धतीने वळण घेतात, तर काही वाहतुकीचे नियम धाब्यावर लावून आडवी गाडी मारतात. त्यामुळे येथे वारंवार छोटे–मोठे अपघात घडत आहेत.
- वेगवान वाहने आणि अरुंद रस्ते
महामार्गावर चारचाकी आणि अवजड वाहनांची गर्दी मोठया प्रमाणात वाढली आहे. दोन्ही बाजूनी वाहतुकीचा वेगही वाढला आहे. या वाढत्या वाहतुकीने वडणगे गावातून जाताना वडणगे फाटा येथील पेट्रोल पंपाकडे टर्न घेणे धोकादायक झाले आहे. यातून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
- सायं. 6 ते रात्री 9 पर्यंत कोंडी
सायंकाळी कामावरुन घरी जाणऱ्यांची सख्या जास्त प्रमाणामध्ये असल्याने महामार्गावर गोंधळ उडतो, वाहतूक धिम्या गतीने चालते आणि नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- किरकोळ व्यापाऱ्यांची गर्दी
शिवाजी पूलापासून 20 मीटर अंतरावर उजव्या बाजूस फेरिवाले, फळे विकणारे तसेच किरकोळ मालाच्या व्यापारांची गर्दी वाढली आहे. यांची रस्त्याच्या कडेला दूकाने असल्याने नागरिकांची खरेदी करण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
- तत्काळ उपाययोजना हवी…
–या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिक आणि प्रवाशांची प्रशासनाकडे तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी
–गतिरोधक बसवावेत : पेट्रोल पंप आणि इतर ठिकाणी गतिरोधक बसवणे आवश्यक
–रस्त्यांचे योग्य नियोजन करावे : वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक चिन्हे आणि दिशादर्शक फलक लावावेत
- नागपूर–रत्नागिरी महार्गाच्या कामामुळे होतो वाहतुकीस अडथळा
नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम चालू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. वाहनांची संख्या जास्त झाल्यामुळे रस्ता अऊंद पडत आहे. त्यामुळे सकाळी तसेच संध्याकाळी वाहनांची कोंडी झालेली पाहायला मिळत आहे.
सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले की वडणगे फाटा ते छत्रपती शिवाजी पूल रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे खूप कसरत करत या रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
–प्रदीप घोरपडे, वडणगे
या महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मोठा झाला आहे. सकाळी दहा ते बारा व संध्याकाळी चार ते सात या वेळेत या रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त होते. त्यामुळे कोंडी मोठ्या प्रमाणात होते प्रशासनाने यावर वेळीच तोडगा काढण्याची गरज आहे.
–अमित लोहार, वडणगे








