विठ्ठल हलगेकर : भविष्यातही वेगवेगळे उपक्रम राबविणार : शेवटच्या प्रयोगालाही शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद
प्रतिनिधी / खानापूर
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र युवकांसह सर्वांनीच अभ्यासावे, यासाठी प्रभावी माध्यम म्हणून शिवगर्जना नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी महाराजांचा आदर्श, त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व अभ्यासले जावे, यासाठी भविष्यातही वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी शिवगर्जना प्रयोगाच्या शेवटच्या दिवशीच्या उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, आमदार अनिल बेनके, कृष्णा भट, तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, नगराध्यक्ष नारायण मयेकर, नगरसेवक लक्ष्मण मादार, यात्रा कमिटी अध्यक्ष नामदेव गुरव, बाळासाहेब शेलार आदी उपस्थित होते.
तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपून समाजसेवा केलेल्यांचा तसेच वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टर व औषध दुकानदार असोसिएशन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले, छत्रपती शिवाजीराजे जागतिक कीर्तीचे सर्वश्रेष्ठ राजे असून आजही त्यांच्या आदर्शाचा, युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. त्यांनी अवघ्या काही मावळ्यांना घेऊन बलाढ्या शक्तीशी युक्तीने लढा दिला व स्वराज्य उभारले. त्यांचे हे कार्य युवकांनी आत्मसात करावे. या महानाट्याच्या माध्यमातून शिवचरित्राची भेट नवी ऊर्जा व प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
चार दिवसात दीड लाखावर जनता उपस्थित
शिवगर्जना नाटकातील कलाकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेले विनायक चौगुले, दिग्दर्शक स्वप्नील यादव, निर्मात्या रेणू यादव, कलाकार अभिजीत कालेकर यांसह कलाकारांचा सत्कार करण्यात आला. शेवटच्या दिवशी शिवगर्जना महानाट्या पाहण्यास शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. चार दिवसात दीड लाखाच्यावर लोकांनी या नाटकाचा आस्वाद घेतला.









